Headlines

हवामान बदल भविष्याचा नव्हे, आजचा प्रश्न; पृथ्वी अतिदक्षता विभागात:पर्यावरणतज्ज्ञ अतुल देऊळगावकर यांचे मत, विकासाची दिशा बदलण्याची गरज




हवामान बदल हा भविष्यातील प्रश्न नसून आजच्या पिढीसमोरील गंभीर संकट आहे. पृथ्वीची पर्यावरणीय प्रकृती दिवसेंदिवस बिघडत असून तिची अवस्था अतिदक्षता विभागात दाखल केलेल्या रुग्णासारखी झाली आहे. निसर्गाशी असलेले आपले नाते समजून घेण्याची गरज असताना विकासाच्या जुनाट संकल्पनांमुळे पर्यावरणाचा वेगाने ऱ्हास होत आहे. भविष्यातील पिढ्यांना निरोगी पर्यावरण द्यायचे असेल तर विकासाची दिशा आणि जीवनशैली बदलणे अपरिहार्य आहे, असे मत पर्यावरणतज्ज्ञ, लेखक व पत्रकार अतुल देऊळगावकर यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दल, महाराष्ट्र यांच्या वतीने गांधी भवन, कोथरूड येथे महात्मा गांधी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत ‘पोरेके पर्यावरण’ या विषयावर देऊळगावकर यांचे व्याख्यान झाले. सुमारे ६० स्लाइडच्या सादरीकरणातून त्यांनी हवामान बदल, प्रदूषण, जंगलतोड, शहरीकरण, कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरणपूरक विकास याबाबत विवेचन केले. तुषार गांधी अध्यक्षस्थानी होते. देऊळगावकर म्हणाले, ‘‘यंत्रयुगाच्या काळात निसर्गाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलला. निसर्ग ही केवळ वापरण्याची वस्तू नसून त्यामध्ये असंख्य सजीवांचे परस्परावलंबी जग आहे. एका झाडावर सुमारे ३०० ते ४०० प्रकारचे कीटक अवलंबून असतात. ही साखळी समजून घेतल्याशिवाय पर्यावरण संवर्धन शक्य नाही.’’ २०२५ मध्ये देशात तब्बल ३२१ दिवस वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्तींची नोंद झाली. मात्र, आपली धोरणे प्रामुख्याने पाच वर्षांनी होणाऱ्या निवडणुकांभोवती केंद्रित असल्याने पर्यावरणासाठी दीर्घकालीन नियोजन होत नाही. हवामान बदलामुळे तापमानवाढीचा वेग वाढत असून यंत्रयुगाच्या तुलनेत जागतिक तापमानात सुमारे दीड अंश सेल्सिअसची वाढ झाली आहे. ही परिस्थिती भविष्यात अधिक गंभीर होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. शहरी आणि ग्रामीण भागातील हवेतील सूक्ष्म धूलिकण मानवी आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहेत. २.५ मायक्रॉन आकाराचे सूक्ष्म धूलिकण शरीरात खोलवर प्रवेश करून गंभीर आजारांचा धोका वाढवू शकतात. प्रदूषणाची किंमत आपण थेट आपल्या आरोग्यातून चुकवत आहोत. त्यामुळे भविष्यातील पिढ्यांना वाचवण्यासाठी आजच पर्यावरणीय धोरणांमध्ये बदल करणे आवश्यक आहे, असे देऊळगावकर यांनी नमूद केले. मोठ्या कंपन्यांकडून होणाऱ्या प्रदूषणाकडेही त्यांनी लक्ष वेधले. प्रदूषण करणाऱ्यांवर प्रभावी नियंत्रण आणि जबाबदारी निश्चित करण्यासाठी कार्बन करासारख्या उपायांचा विचार करावा. कचरा व्यवस्थापनातही जीवनशैलीतील बदल आवश्यक आहेत. झाडांपासून तयार होणाऱ्या कागदी वस्तूंचा अनावश्यक वापर कमी करून पुनर्वापरावर भर द्यावा. शहराचा आकार वाढत जाईल तसा कचरा वाढतो; त्यामुळे ओल्या कचऱ्याचे खतामध्ये रूपांतर करण्याच्या उपाययोजना मोठ्या प्रमाणावर राबवाव्यात, असे त्यांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *