Headlines

पुण्यात आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल:ज्ञानेश कुमार आणि विवेक भीमनवारयांच्या राजीनाम्याची मागणी




पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी भेट देत आंदोलनकर्त्यांना पाठिंबा दिला. यावेळी त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भिमनवार यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली. तसेच दोघांच्या राजीनाम्याची मागणी पुन्हा एकदा ठामपणे मांडली. ‘ज्ञानेश कुमारांचा राजीनामा घेणारच’ आदित्य ठाकरे यांनी आपल्या भाषणातून निवडणूक प्रक्रियेबाबत सुरू असलेल्या देशव्यापी चर्चेचा मुद्दा उपस्थित केला. देशभरात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी होत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या मते, हा केवळ एका राज्यापुरता किंवा एका पक्षापुरता मर्यादित विषय नसून लोकशाही आणि देशाच्या भवितव्याशी संबंधित प्रश्न आहे. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी आपण सोडणार नसल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भिमनवार यांच्या राजीनाम्याची मागणीही त्यांनी केली. विद्यार्थ्यांनी भिमनवारांचा मुद्दा उपस्थित केला आंदोलनस्थळी विद्यार्थ्यांनी एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भिमनवार यांचे नाव घेतल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी त्यांच्यावरही भाष्य केले. भिमनवार हे या संपूर्ण प्रकरणातील केवळ ‘प्यादे’ असल्याचे सांगत त्यांनी या मुद्द्यामागे आणखी मोठे राजकीय शक्तिकेंद्र असल्याचा आरोप केला. ‘भिमनवारांच्या मागे कोण आहे?’ असा सवाल करत आदित्य ठाकरे यांनी थेट सरकारला लक्ष्य केले. केवळ व्यक्तींवर कारवाई किंवा राजीनाम्याची मागणी करण्यापेक्षा या निर्णयांमागील जबाबदार व्यक्ती आणि यंत्रणांचाही शोध घेतला पाहिजे, असे त्यांनी सूचित केले. ‘फडणवीस साहेब, विद्यार्थ्यांचा आवाज ऐका’ यावेळी आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे लक्ष देण्याचे आवाहन केले. पुण्यात सुरू असलेल्या आंदोलनाचा आवाज आता संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचला असून विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असे त्यांनी म्हटले. विद्यार्थ्यांच्या आंदोलनात उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांना उद्देशून त्यांनी त्यांच्या मागण्यांना पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले. कोणाच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे, हा मुद्दा सरकारने गांभीर्याने ऐकला पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले. ‘दोघेही देशाचे भवितव्य खराब करत आहेत’ ज्ञानेश कुमार आणि विवेक भिमनवार यांच्यावर टीका करताना आदित्य ठाकरे यांनी हे दोघेही देशाचे भवितव्य खराब करत असल्याचा आरोप केला. त्यांच्या निर्णयांमुळे लोकशाही व्यवस्था आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर परिणाम होत असल्याचे त्यांनी म्हटले. त्यामुळे संबंधित पदांवर राहण्याचा नैतिक अधिकार या दोघांनी गमावला असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत असल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले. राहुल गांधी, प्रियंका गांधींच्या अटकेचाही उल्लेख आपल्या भाषणात आदित्य ठाकरे यांनी दिल्लीतील राजकीय घडामोडींचाही संदर्भ दिला. राहुल गांधी, प्रियंका गांधी तसेच अन्य खासदारांना अटक करण्यात आल्याचा उल्लेख करत त्यांनी देशभरात लोकशाहीच्या मुद्द्यावर आंदोलन सुरू असल्याचे सांगितले. पुण्यातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला देशातील या व्यापक राजकीय घडामोडींशी जोडत ठाकरे यांनी केंद्र सरकारवरही निशाणा साधला. लोकशाही संस्थांबाबत निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे सरकारने द्यायला हवीत, अशी भूमिका त्यांनी मांडली. आंदोलनाला राजकीय पाठिंबा वाढला रोहित पवार यांच्या आंदोलनाला यापूर्वी विविध राजकीय नेत्यांनी पाठिंबा दिला आहे. आता आदित्य ठाकरे यांनी आंदोलनस्थळी प्रत्यक्ष उपस्थित राहत भूमिका मांडल्याने या आंदोलनाला महत्त्वाचे राजकीय समर्थन मिळाले आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांपासून निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीपर्यंत विविध मुद्द्यांवर सरकारविरोधात दबाव वाढवण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जात आहे. दरम्यान, पुण्यातील या आंदोलनात विद्यार्थ्यांनी आणि आंदोलकांनी आपल्या मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी केली. आदित्य ठाकरे यांनीही आंदोलकांच्या मागण्यांना पाठिंबा देत ज्ञानेश कुमार आणि विवेक भिमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी कायम ठेवणार असल्याचे स्पष्ट केले. हेही वाचा…. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मोठा दिलासा:प्रत्येक जिल्ह्यात वीजयंत्रणा मजबूत होणार, 20 कोटींच्या निधीला मंजुरी राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना सिंचनासाठी सुरळीत आणि पुरेशा दाबाने वीजपुरवठा मिळावा, यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्यात वीज वितरण व्यवस्था बळकट करण्यासाठी 20 कोटी रुपयांपर्यंतचा विशेष निधी उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. या निधीतून नवीन वितरण रोहित्रे, स्पेशल डिझाईन ट्रान्सफॉर्मर आणि कॅपॅसिटर बँक खरेदी करून आवश्यक ठिकाणी बसवण्यात येणार आहेत. सविस्तर वाचा….



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *