Headlines

हिंगोलीत अवैध वाळू वाहतूक करणारे तीन हायवा पकडले:35 लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल




हिंगोली शहरातून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या 3 हायवासह 35 लाखांचा मुद्देमाल महसूल विभागाच्या पथकाने जप्त केला आहे. या प्रकरणी तिघांवर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात मंगळवारी ता. 29 गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली शहरातून तीन हायवामध्ये वाळू भरून वाहतूक होत असल्याची माहिती महसूल विभागाच्या पथकाला मिळाली होती. यावरून तहसीलदार श्रीकांत भुजबळ, मंडळ अधिकारी प्रदीप इंगोले, अमोल घोंगडे, सय्यद अब्दूल, शेख मुस्ताक, नागेश स्वामी, अनिल काळे, नवनाथ वाानोळे, गणपत वाठोरे, मल्लीनाथ मंडीवाले यांच्या पथकाने मंगळवारी ता. 29 सकाळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे तीन वाहने थांबवून त्यांची तपासणी केली. यामध्ये तीनही वाहनांमधे एकूण 9 ब्रास वाळू आढळून आली. यावेळी पथकाने तीनही हायवा चालकांकडे वाहतूकीच्या पावत्या मागितल्या असता त्या पावत्या जिंतूर ते अमरावती अशा होत्या. त्यानंतर संशय आल्याने महसूलच्या पथकाने ॲपमध्ये तपासणी केली असता त्यात सदर वाहने लिंबाळा तांडा (ता. सेनगाव) ते हिंगोली अशी वाहतूक दाखवित होते. त्यामुळे पथकाने तीनही वाहनांसह 9 ब्रास वाळू असा 35 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पोलिस ठाण्यात आणला. या प्रकरणी मंडळ अधिकारी प्रदीप इंगोले यांनी दिलेल्या तक्रारीवरून हिंगोली शहर पोलिसांनी चित्रगंज रोडगे (रा. जांभरून रोडगे), इरफान शहा (रा. रुपुर कँम्प), प्रकाश शिंदे (रा. सुकळी बुद्रूक) यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक देवेंद्रसिंह ठाकुर, सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक मस्के, जमादार अशोक धामणे पुढील तपास करीत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *