Headlines

हिंगोलीत चोरीच्या संशयावरून तरुणाची निर्घृण हत्या:3 संशयितांना पोलिसांनी घेतले ताब्यात, गुन्हा दाखल




हिंगोली शहरातील आझमकॉलनी भागातील तरुणाचा भंगार चोरी व गल्लयातील पैसे चोरल्याच्या संशयावरून मारहाण करून खून केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात तिघांवर मंगळवारी ता. 15 पहाटे गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी केली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली शहरालगत हिंगोली ते गारमाळ रोडवर सोमवारी ता.14 सकाळी एका तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. पोलिस उपाधिक्षक सतीष वाघ, हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक विष्णुकांत गुठ्ठे, उपनिरीक्षक राहुल घुले, श्रीदेवी वग्गे, जमादार बाळासाहेब खोडवे यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी सदर मृतदेहाची ओळख पटविण्याचे प्रयत्न केले. मृतदेहाची माहिती समाज माध्यमावर प्रसिध्द केली असता सायंकाळी उशीरा मृतदेहाची ओळख पटली. मयत तरुणाचे कुटुंबिय आल्यानंतर त्यांनी सदर मृतदेह शहरातील आझम कॉलनी भागातील शेख शब्बीर शेख रफीक (34) यांचा असल्याचे सांगितले. या प्रकरणी मयत शेख शब्बीर यांचा भाऊ शेख शारुख यांनी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यामध्ये त्यांचा भाऊ शेख शब्बीर यांना शहरातील सौरभ पत्रे, नितीन कोल्हे, शिवदास घाडे यांनी सौरभ याच्या भंगार विक्रीच्या दुकानातील भंगार चोरी तसेच गल्यातील पैसे चोरीच्या संशयावरून त्यांना मारहाण करून त्यांचा खून केल्याचे नमुद केले. यावरून पोलिसांनी तिघांविरुध्द मंगळवारी पहाटे गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले, उपनिरीक्षक दिलीप मोरे, जमादार संदीप जाधव यांचे तातडीने एक पथक स्थापन करून संशयीत आरोपींचा शोध सुरु केला. या पथकाने सौरभ, नितीन व शिवदास यांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. उपनिरीक्षक राहुल घुले पुढील तपास करीत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *