Headlines

हिंदीचा आत्मविश्वास वाढवा; शब्दसंग्रहासह व्याकरणाचा अभ्यास करा- प्राचार्य गायकवाड:रेसिडेन्शिअल हायस्कूलमध्ये कविता, देशभक्तीपर गीते, नाटिका,निबंध स्पर्धेतील विद्यार्थ्यांचा गौरव‎




विद्यार्थ्यांनी हिंदी भाषेचा शब्दसंग्रह वाढविण्यासोबतच शुद्धलेखन, बाराखडी, ऱ्हस्व-दीर्घ, व्याकरण, स्वर व व्यंजनांचा बारकाईने अभ्यास करावा. हिंदी भाषेचा आत्मविश्वासाने वापर करण्याची सवय विद्यार्थ्यांनी अंगीकारावी, असे प्रतिपादन रेसिडेन्शिअल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्सचे प्राचार्य बालाजी गायकवाड यांनी केले. १४ सप्टेंबर हिंदी राष्ट्रभाषा दिनानिमित्त विद्यालयात आयोजित कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. हिंदी भाषेत अनेक साहित्यिकांनी दर्जेदार लेखन केले असून, विद्यार्थ्यांनी हिंदीचा अभ्यास व्यापक दृष्टिकोनातून करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. इंग्रजी विषय शिक्षक संतोष मिसाळ यांनी हिंदीचे महत्त्व केवळ हिंदी दिनापुरते मर्यादित न ठेवता दैनंदिन जीवनातही या भाषेचा वापर वाढविण्याची गरज व्यक्त केली. हिंदी ही जगात मोठ्या प्रमाणावर बोलली जाणारी भाषा असून, दैनंदिन व्यवहारात तिचा अधिकाधिक वापर व्हावा, असे हिंदी विषय शिक्षक रामनाथ काळे यांनी सांगितले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी हिंदी कविता, देशभक्तीपर गीते, गोष्टी व नाटिका सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. अनेक विद्यार्थ्यांनी हिंदी दिनानिमित्त मनोगते व्यक्त केली. विद्यालयात आयोजित निबंध स्पर्धेतील विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच हिंदी राष्ट्रभाषा पुणे यांच्या वतीने विद्यालयातील हिंदी शिक्षकांना मिळालेली प्रमाणपत्रे व सन्मानचिन्हे प्राचार्य बालाजी गायकवाड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. यावेळी पर्यवेक्षक महेश शिंदे, चंद्रकांत अमृते, जयप्रकाश जाधव, विजय शिंदे, संजय देवढे, बाळासाहेब गव्हाळ, स्वाती ढोले, कोल्हे मॅडम, दीपक भारस्कर यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन समृद्धी लांडे व श्वेता डमाळ यांनी केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *