Headlines

ॲड. असीम सरोदे यांचा आमदार गायकवाडांना कायदेशीर इशारा:प्रशांत आंबींना धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल न झाल्यास उच्च न्यायालयात दाद




आमदार संजय गायकवाड यांनी प्रशांत आंबी यांना शिवीगाळ करत ‘जीभ कापून टाकू’ अशी धमकी दिल्याप्रकरणी कायदेशीर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. प्रसिद्ध विधीज्ञ ॲड. असीम सरोदे यांनी कोल्हापूर पोलिसांकडे धाव घेत, गायकवाड यांच्यावर दखलपात्र गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशाराही सरोदे यांनी दिला आहे. प्रशांत आंबी यांनी गायकवाड यांच्याविरोधात कोल्हापूर पोलिसांत तक्रार दाखल केली होती. मात्र, पोलिसांनी हा गुन्हा दखलपात्र म्हणून नोंदवण्यास नकार दिला असून, विधी सल्लागाराचा सल्ला घेणार असल्याचे म्हटले आहे. यावर ॲड. सरोदे यांनी तीव्र आक्षेप घेतला. ते म्हणाले की, कोल्हापूर पोलिसांवर राजकीय दबाव असल्यानेच ते गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत आहेत. पुण्यातील हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर अशाच प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता, मग गायकवाड यांना वेगळा न्याय का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. या वादाचे मूळ ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकापर्यंत पोहोचले आहे. या पुस्तकाच्या १० हजार प्रती विकल्या गेल्या असून, त्याबद्दल प्रशांत आंबी यांना रॉयल्टी मिळावी, अशी मागणी सरोदे यांनी केली आहे. याव्यतिरिक्त, गायकवाड यांच्या आमदारकीच्या निवडीबाबत नागपूर न्यायालयात सुनावणी सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले. सरोदे यांनी गायकवाड यांच्या सार्वजनिक वागणुकीवरही टीका केली. सध्या प्रशांत आंबी यांना सातत्याने धमकीचे फोन येत असून, त्यांच्या कुटुंबात भीतीचे वातावरण आहे. संजय गायकवाड यांनी यापूर्वीही अशा प्रकरणातून पळ काढण्याचा प्रयत्न केला आहे, त्यामुळे त्यांना पोलीस कोठडी मिळणे आवश्यक असल्याचे सरोदे यांनी स्पष्ट केले. आता कोल्हापूर पोलीस या कायदेशीर इशाऱ्यानंतर काय पाऊल उचलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *