![]()
शिक्षण क्षेत्रातील १६० कोटींचा बहुचर्चित शालार्थ आयडी घोटाळ्याची व्याप्ती वाढतच असून संस्थाचालक, मुख्याध्यापक, एजंट, शिक्षणाधिकारी ते शिक्षण संचालक अशा सर्वांच्या संगनमताने तब्बल ८४१ बोगस शिक्षक भरती केल्याचे तपासात उघडकीस आले. हा तपास राजकीय क्षेत्रातील शिक्षणसम्राटांच्या उंबरठ्यावर पोहोचला असून पोलिस आयुक्तांनी स्वतंत्र एसआयटी स्थापन करुन या तपासाला गती दिली आहे. याच प्रकरणात शिक्षणाधिकारी प्रशांत वाडिले याचा क्लार्क आणि या अपहारातील आणखी एक मास्टरमाइंड तुषार साळुंखे याला शिरपूरमध्ये ताब्यात घेण्यात आले. या घोटाळ्यात सर्व तांत्रिक बाबी मॅनेज करून संगणक प्रणालीचा गैरवापर करणारा साक्री येथील साळुंखे हा प्रमुख संशयित असून त्याला पुरावे हाती येताच विशेष चौकशी पथकाने ताब्यात घेतले. जुन्या टाइपरायटरवर टाइप केलेले बोगस नियुक्तिपत्र शालार्थ आयडी हा फक्त अपहार नसून नियोजनबद्ध शासनाची लूट करणारे रॅकेट होते. ज्या शाळेत बोगस भरती केली,तेथील विद्यार्थी पटसंख्यादेखील वाढवल्याचे जुने रेकॉर्ड जप्त केले आहे. डिजिटल युगात संशय येऊ नये म्हणून जुन्या टाइपरायटरवर टाइप केलेले आणि हस्तलिखित बनावट नियुक्तिपत्र तयार करण्यात येत असे.
Source link
160 कोटींचा शालार्थ आयडी घोटाळा:लिपिक साळुंखे शिरपूरमधून ताब्यात, अपहारातील आणखी एक मास्टरमाइंड गळाला, बडे मासे लवकरच येणार