![]()
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) औषध निरीक्षक पद भरती परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास नंदुरबार येथून ऋतुजा अमृत पाटील हिला तिच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले. ती मेरिट लिस्टमध्ये सातव्या क्रमांकावर होती. तिच्या वडिलांना यापूर्वीच अटक झाली आहे. वैद्यकीय तपासणीनंतर रात्री उशिरा पथक ऋतुजाला सोबत घेत मुंबईला रवाना झाले. या कारवाईमुळे या गैरप्रकारात अटक झालेल्या संशयितांची एकूण संख्या आता सातवर पोहोचली आहे. या घोटाळ्यात एमपीएससीशी संबंधित अधिकाऱ्यांसह नंदुरबार जिल्ह्यातील ४ संशयितांचा समावेश आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी मुंबई गुन्हे शाखेचे पथक आतापर्यंत तीनदा नंदुरबारमध्ये धडकल्याने हा जिल्हा संपूर्ण पेपरफुटी प्रकरणाच्या तपासाचे मुख्य केंद्र बनला आहे. आमदार रोहित पवारांच्या आरोपानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. दहिंदुलेच्या गोपाल मराठेंच्या मालमत्ताही रडारवर… या गैरव्यवहारात नंदुरबार तालुक्यातील दहिंदुले येथील मूळ रहिवासी असलेला व आयोगात कार्यरत कर्मचारी गोपाल मराठे यांचा थेट सहभाग असल्याच्या संशयातून त्यांना अटक केली आहे. गोपाल मराठे हे कौटिल्य क्लासचे माजी विद्यार्थी असल्याची माहिती आहे. पथकाने मंगळवारी कौटिल्य क्लाससह मराठे यांच्याबाबत चौकशी केल्याचे समजते. त्यामुळे त्यांच्या मालमत्तेची पथकाकडून चौकशी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुख्य परीक्षेच्या मूल्यमापनात प्रचंड तफावतीचा आरोप दरम्यान, गेल्या वर्षी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) धर्तीवर पहिल्यांदाच राबवण्यात आलेल्या वर्णनात्मक पॅटर्ननुसार घेतलेल्या मुख्य परीक्षेच्या मूल्यांकनात प्रचंड तफावत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. त्यांचे म्हणणे आहे की, अनेक गुणवंतांना मराठी व इंग्रजी या प्रत्येकी ३०० गुणांच्या अर्हताकारी पेपर्समध्ये अवघ्या एका-दोन गुणांनी अनुत्तीर्ण करण्यात आले आहे. या पेपर्समध्ये किमान २५% (७५ गुण) अनिवार्य असताना त्रुटीपूर्ण तपासणीमुळे हे विद्यार्थी बाद झाले. सर्व भरती परीक्षांच्या चौकशीची क्लासेस चालकांची मागणी पुणे येथील पत्रकार परिषदेत क्लासेस चालक, शिक्षक नीलेश निंबाळकर आदींनी मागणी केली की, सर्व परीक्षांची सखोल चौकशी करावी. एमपीएससी परीक्षा घोटाळ्यातील अधिकाऱ्यांचे फॉरेन्सिक ऑडिट करावे. एमपीएससी आयोगाचे अध्यक्ष, सचिवांची कार्यमुक्त करून चौकशी करावी.
Source link
मेरिट लिस्टमध्ये सातव्या क्रमांकावरील नंदुरबारची ऋतुजा पाटीलही गजाआड:एमपीएससी औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणात सातवी अटक