![]()
पथविक्रेत्यांना सन्मानाने व्यवसाय करू द्या, स्मार्ट मीटरला हद्दपार कर, यासह अन्य मागण्यांसाठी बहुजन मुक्ती पार्टीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. विविध मागण्यांचे निवेदनही जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. अनेक फेरीवाले, पथविक्रेते रस्त्याच्या कडेला बसून भाजीपाला, फळे विकून आपला उदरनिर्वाह भागवत आहेत. मात्र त्यांच्यावर अतिक्रमण विभाग व प्रशासनाच्या माध्यमातून रोज कारवाई करून त्यांच्या मालाची नासधूस केली जाते. जप्त केलेला माल पथविक्रेत्याला परत द्यायला हवा असा कायदा असतानाही त्याची पायमल्ली होत आहे. यामुळे त्यांचे जगणे मेटाकुटीला आलेले आहे, असे बहुजन मुक्ती पार्टीचे म्हणणे आहे. काही दिवसांपूर्वी अशाच नेहमीच्या त्रासाला कंटाळून बदलापूर येथील एका तरुणाला ट्रेनखाली झोकून देत आत्महत्या करावी लागली आहे.उर्वरित महाराष्ट्रातही अशीच परिस्थिती आहे. खरे तर पथविक्रेते अधिनियम २०१४ नुसार व २०१५ नुसार अशी कारवाई करणे वा त्यांना सन्मानजनक उपजीविका भागवण्यापासून रोखणे हे पूर्णतः गैर आहे. किंबहुना सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा अनुच्छेद १९ (१) (ग) अंतर्गत व्यवसायाचा अधिकार मान्य केला आहे. मुंबई उच्च न्यायालयानेही राज्य शासन, स्थानिक स्वराज्य संस्थांना पथ विक्रेता कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची टाऊन वेंडिंग कमिटीच (टीव्हीसी) स्थापना, सर्वेक्षण आणि योजना अंतिम करण्याचे निर्देश दिले आहेत. असे असतांना या सर्व गोष्टीची पूर्तता न करता उपरोक्त व्यावसायिकांना त्यांच्या सन्मानजनक रोजगारापासून वंचित केले जात असून हे राज्यभर सुरू असल्याचा आरोप करण्यात आला. या विरोधात पार्टीच्या माध्यमातून तीव्र आंदोलन घोषित केले आहे. त्याचे दुसरे चरणातील धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात योगेश जायले, इक्बाल शाहीद, रवी सरदार, चंदन वानखडे, शेख रहेमत, विनोद सिरसाट, अब्दुल गफ्फार, प्रेमसुत गजरे, दीपक लोखंडे, विजय पळसपगार, शरीफ पठाण यांच्यासह बहुजन मुक्ती पार्टीचे पदाधिकारी व पथविक्रेते उपस्थित होते. अधिनियम २०१४ व महाराष्ट्र नियम २०१५ ची राज्यभर अमलबजावणी केली जावी. पथविक्रेत्यांचे तात्काळ सर्वेक्षण करण्यात यावे. पथविक्रेत्यांना त्यांच्या व्यवसायाचे अधिकृत प्रमाणपत्र प्रदान करावे. पथ विक्रेत्यांच्या घटनात्मक अधिकाराचे संरक्षण करून सन्मानजनक उपजीविका भागवण्याच्या हक्काचे रक्षण करावे. पथविक्रेत्यांचा जप्त केलेला माल त्यांना परत करण्यात यावा. पथविक्रेत्यांना व्यवसाय करण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी. ग्राहकांच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने स्मार्ट मीटर बसवू नये. स्मार्ट मीटर व जुने डिजिटल मीटर समांतर मोजणीसाठी ६ महिने ठेवण्यात यावे. प्रत्यक्ष रीडिंग न करता अंदाजे वीजबिल ग्राहकांना देऊ नये. दीर्घकाळ वीज खंडित झालेल्या कृषी व घरगुती ग्राहकांना नुकसान भरपाई देण्यात यावी आदी मागण्या आंदोलकांनी केल्या. …अन्यथा मंत्रालयावर मोर्चा: यापुढील आंदोलन हे मंत्रालयावर लाखो पथविक्रेत्यांचा महामोर्चा काढण्यात येईल, असा इशारा बहुजन मुक्ती पार्टीचे महाराष्ट्र राज्य प्रभारी सुमित्र अहिरे व बहुजन मुक्ती पार्टीचे राज्य अध्यक्ष प्रताप पाटील यांनी दिला आहे.
Source link
पथविक्रेत्यांना सन्मानाने व्यवसाय करु द्या; स्मार्ट मीटर हद्दपार करा:बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर धरणे आंदोलन