Headlines

महाराष्ट्रात पुन्हा बरसणार पाऊस!:सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यात जोरदार पुनरागमन; विदर्भासह-मराठवाड्यालाही दिलासा, पुढे ऑक्टोबर हीटचा तडाखा




ऑगस्ट महिन्याच्या उत्तरार्धात पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे चिंतेत असलेल्या महाराष्ट्राला सप्टेंबरच्या सुरुवातीलाच दिलासा मिळण्याची शक्यता आहे. राज्यात पुढील काही दिवसांत मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची चिन्हे दिसत असून 3 ते 5 सप्टेंबरदरम्यान अनेक भागांत चांगला पाऊस होण्याचा अंदाज आहे. विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे. काही भागांत विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशाराही देण्यात आला आहे. हवामानातील हा बदल बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ठळक कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आणि विविध भागांत सक्रिय असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील पावसाचे चित्र बदलू शकते. मात्र, महिन्याच्या उत्तरार्धात पावसाचा जोर पुन्हा कमी होऊन अंतर्गत महाराष्ट्रात तापमान वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सप्टेंबरच्या सुरुवातीला गारवा आणि पाऊस, तर पुढील काळात उन्हाचा चटका असे बदलते हवामान अनुभवायला मिळू शकते. 3 ते 5 सप्टेंबरदरम्यान राज्यात पावसाचा जोर वाढणार सध्या मान्सूनचे प्रवाह काही प्रमाणात कमकुवत झाल्याने राज्यातील अनेक भागांत पावसाने उघडीप दिली आहे. मात्र, बंगालच्या उपसागरातील हवामान प्रणालीमुळे ही परिस्थिती बदलण्याची शक्यता आहे. ओडिशाहून पश्चिमेकडे सरकणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव महाराष्ट्रावर जाणवण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर दक्षिण गुजरातपासून उत्तर-मध्य महाराष्ट्रापर्यंत वाऱ्याची द्रोणीय रेषा सक्रिय आहे. या दोन्ही हवामान प्रणालींमुळे 2 सप्टेंबरच्या संध्याकाळपासून उत्तर-मध्य महाराष्ट्रातील पावसात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यानंतर 3 ते 5 सप्टेंबरदरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी चांगला पाऊस होण्याचा अंदाज आहे. विदर्भ आणि मध्य प्रदेशाला लागून असलेल्या भागांमध्ये या प्रणालीचा प्रभाव तुलनेने अधिक राहण्याची शक्यता आहे. विदर्भातील 3 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने विदर्भातील गोंदिया, गडचिरोली आणि भंडारा या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या भागात मुसळधार पावसासह काही ठिकाणी विजांच्या कडकडाटाची शक्यता आहे. विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्येही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच पुण्याच्या घाट परिसरात, मध्य महाराष्ट्रातील घाट भागात आणि दक्षिण कोकणात मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत नदी-नाले, धरणांच्या पाणलोट क्षेत्रात आणि घाट परिसरात पावसाचा जोर वाढू शकतो. आज या जिल्ह्यांना येलो अलर्ट आज, 2 सप्टेंबरला, विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांसह मराठवाड्यातील नांदेडमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने या भागांसाठी येलो अलर्ट दिला आहे. यामध्ये नांदेड, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे. उर्वरित महाराष्ट्रातही ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून, काही ठिकाणी ऊन-सावल्यांचा खेळ आणि तुरळक ठिकाणी विजांसह हलका पाऊस होऊ शकतो. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र ठळक पश्चिम बंगाल, ओडिशा आणि झारखंड परिसरात ठळक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले आहे. या प्रणालीला समुद्रसपाटीपासून सुमारे 7.6 किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती जोडलेली आहे. ही हवामान प्रणाली पश्चिम आणि वायव्य दिशेने सरकण्याची शक्यता असून तिचा परिणाम महाराष्ट्रातील पावसावर होण्याची शक्यता आहे. याशिवाय जम्मूपासून चंडीगड, शाहजहानपूर, वाराणसीमार्गे बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रापर्यंत मॉन्सूनचा आस सक्रिय आहे. दक्षिण गुजरात, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडपासून कमी दाबाच्या केंद्रापर्यंत आणखी एक कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने महाराष्ट्रातील काही भागांत पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. सप्टेंबरमध्ये पावसाचे 4 आठवडे कसे असतील? हवामानाच्या दीर्घकालीन अंदाजानुसार सप्टेंबरमध्ये महाराष्ट्रात पावसाचे स्वरूप आठवड्यानुसार बदलण्याची शक्यता आहे. सुरुवातीला गारवा, नंतर उन्हाचा चटका सप्टेंबरच्या सुरुवातीला ढगाळ वातावरण आणि पावसामुळे कमाल तापमानात 2°C ते 4°C पर्यंत घट होऊ शकते. त्यामुळे दुपारच्या उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. रात्रीही वातावरण तुलनेने सुखद राहू शकते. पहिल्या आठवड्यात बहुतांश भागांत कमाल तापमान 28°C ते 32°C दरम्यान राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर पावसाची हजेरी कायम राहिल्यास तापमान सरासरीपेक्षा 1°C ते 3°C कमी राहू शकते. मात्र, पावसाने उघडीप दिल्यानंतर आणि आकाश निरभ्र होऊ लागल्यानंतर अंतर्गत महाराष्ट्रात तापमान पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सप्टेंबरच्या उत्तरार्धात उन्हाचा चटका जाणवू शकतो. ‘ऑक्टोबर हीट’चा अनुभव सप्टेंबरच्या उत्तरार्धात? सप्टेंबरच्या उत्तरार्धात पावसाचा जोर कमी झाल्यानंतर राज्याच्या अंतर्गत भागात तापमान वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांना उष्णतेचा अनुभव येऊ शकतो. त्यामुळे पावसाळा संपण्याच्या आधीच काही भागांत ऑक्टोबर हीटसारखी स्थिती जाणवण्याची शक्यता आहे. हवामानाच्या जुन्या नोंदी पाहिल्यास सप्टेंबरमध्येही महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये उच्च तापमानाची नोंद झाली आहे. नाशिकमध्ये 1974 मध्ये 35.5°C, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये 1987 मध्ये 37.0°C कमाल तापमान नोंदवले गेले होते. सोलापूरमध्ये 33.7°C, महाबळेश्वरमध्ये 17°C मंगळवारी, 1 सप्टेंबरच्या सकाळपर्यंतच्या 24 तासांत, सोलापूरमध्ये राज्यातील सर्वाधिक 33.7°C तापमानाची नोंद झाली. तर महाबळेश्वरमध्ये राज्यातील सर्वात कमी 17°C तापमान नोंदवण्यात आले. पावसाच्या नोंदींमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड आणि कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा येथे प्रत्येकी 30 मिमी पाऊस झाला. शेतकऱ्यांसाठी सप्टेंबरचा पाऊस महत्त्वाचा ऑगस्टमध्ये पावसाने घेतलेल्या उघडीपेमुळे राज्यातील अनेक भागांमध्ये शेतीच्या दृष्टीने चिंता निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत 3 ते 5 सप्टेंबरदरम्यान अपेक्षित असलेला पाऊस शेतीसाठी महत्त्वाचा ठरू शकतो. विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण वाढल्यास खरीप पिकांना त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर धरणे, तलाव आणि भूजलसाठ्यांमध्येही वाढ होण्यास मदत होऊ शकते. महाराष्ट्रात अद्याप पावसाची तूट दरम्यान, 31 ऑगस्टपर्यंतच्या आकडेवारीनुसार देशभरात सरासरीपेक्षा 14% पावसाची तूट नोंदवली गेली आहे. महाराष्ट्रातही सरासरीच्या तुलनेत 12% पावसाची तूट आहे. त्यामुळे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात अपेक्षित असलेला पाऊस राज्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. मात्र, मुसळधार पावसासोबत विजांचा कडकडाट आणि वादळी वारे असण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. एकंदरीत, सप्टेंबरची सुरुवात महाराष्ट्रासाठी पावसाच्या पुनरागमनाने होण्याची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक राहू शकतो; तर महिन्याच्या उत्तरार्धात पाऊस कमी होताच तापमान वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवस शेतकरी आणि नागरिकांसाठी हवामानाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहेत. हेही वाचा… सण गोड करण्यासाठी केंद्राचा निर्णय:व्यापाऱ्यांच्या साखर साठेबाजीला वेसण, व्यापाऱ्यांना 2000 क्विंटलपेक्षा अधिक साखरेचा साठा करता येणार नाही सणासुदीत साखर महाग होणे महागात पडू शकते, हे लक्षात आल्यावर केंद्राने व्यापाऱ्यांच्या साखर साठेबाजीला आणखी वेसण घातली. आधी १ ते ३१ ऑगस्टपर्यंत व्यापाऱ्यांना ४००० क्विंटलपर्यंत साठ्याची परवानगी होती. १ सप्टेंबर रोजी नवा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार व्यापाऱ्यांना १५ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर कालावधीत २००० क्विंटलपेक्षा अधिक साखरेचा साठा करता येणार नाही. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *