Headlines

कपाशीवर समाजकंटकांची कुऱ्हाड; जऊळखेडमध्ये पिकाची नासधूस:आधी ठोकबर्डी, आता जऊळखेड बु. येथे उभ्या कपाशीचे पीक उखडले, पोलिसांत तक्रार दाखल‎




जिल्ह्यात गत ३१ दिवसांपासून पावसाने प्रदीर्घ खंड दिल्याने बळीराजा आधीच भीषण आर्थिक संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत चोहोट्टा बाजार जिल्हा परिषद सर्कलमध्ये उभ्या कपाशीच्या पिकाची जाणीवपूर्वक नासधूस करण्याचे प्रकार समोर येत असल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. ठोकबर्डी शिवारात दोन एकरातील कपाशीचे पीक कापून टाकल्याच्या घटनेनंतर, आता जऊळखेड बु. येथेही कपाशीचे पीक उखडून फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ठोकबर्डी येथील शेतकरी बाळू धनराज तरोळे आणि नंदू धनराज तरोळे यांच्या शेतातील जिवंत उभे कपाशीचे पीक अज्ञात व्यक्तींनी कापून नष्ट केले. याप्रकरणी नंदू तरोळे यांनी दहीहांडा पोलीस ठाण्यात काही संशयितांसह एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. ही घटना ताजी असतानाच, जऊळखेड बु. येथील शेतकरी अमोल सोळंके यांच्या शेतातील कपाशीचे पीक मुळासकट उखडून फेकून देण्यात आल्याची घटना घडली. सोळंके यांनीही याप्रकरणी दहीहांडा पोलिसांत धाव घेत तक्रार नोंदवली आहे. परिसरातील इतरही काही शेतकऱ्यांनी अशाच प्रकारच्या तक्रारी केल्याची माहिती समोर येत असल्याने या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले आहे. आधीच दुष्काळसदृश परिस्थितीने शेतकरी होरपळत असताना, रात्रीच्या वेळी पिकांची नासधूस करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई व्हावी आणि महसूल विभागाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे. दोषींवर कठोर कारवाई करा पावसाच्या प्रदीर्घ खंडाने शेती आधीच अडचणीत आली आहे. अशा परिस्थितीत रक्ताचे पाणी करून, मोठा खर्च करून उभे केलेले कपाशीचे पीक कोणीतरी क्रूरपणे कापून टाकल्याचे पाहून धक्का बसला. या विकृत प्रकाराची तक्रार पोलिसांत दिली आहे. पोलिसांनी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि शासनाने आमच्या झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी,अशी मागणी शेतकरी नंदू तरोळे यांनी केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *