Headlines

अस्वच्छतेसह 7 त्रुटी; ब्लिंकिटचा परवाना निलंबित:खाद्यान्नाची अयोग्य साठवणूक, रेकॉर्डचा अभाव; नोटीस देऊनही त्रुटी राहिल्याने एफडीएचा दणका‎



शहरातील मूर्तिजापूर हायवे, कंवर नगर येथील ‘मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड’ या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) निलंबित केला आहे.

.

सहायक आयुक्त (अन्न) दे. गो. वीर यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी र. व्हा. सोळंके यांनी १२ ऑगस्ट रोजी या पेढीची प्रत्यक्ष तपासणी केली होती. या तपासणीत पेढीच्या गोदामात व कामाच्या ठिकाणी अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या होत्या. त्या आधारे १३ ऑगस्ट रोजी पेढीला सुधारणा नोटीस बजावण्यात आली. त्यानंतर पेढीने २१ ऑगस्ट रोजी ऑनलाइन खुलासा सादर केला होता. या खुलाशाच्या आधारे ३१ ऑगस्ट रोजी फेरतपासणी करून त्याच दिवशी सुनावणी घेण्यात आली. मात्र, फेरतपासणीतही पेढीने या गंभीर त्रुटींची पूर्तता केली नसल्याचे स्पष्ट झाल्याने अखेर प्रशासनाने त्यांचा अन्न परवाना निलंबित करण्याचा कठोर निर्णय घेतला. सहायक आयुक्त वीर यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या अशा निष्काळजीपणाविरुद्ध यापुढेही कठोर मोहीम सुरूच राहील, असा इशारा त्यांनी दिला आहे.

तपासणीत आढळला कचरा, साहित्य एकत्र वॉक-इन चिलर व फ्रिझरच्या प्रवेशद्वारावरील प्लास्टिकचे पडदे अत्यंत खराब, फाटलेले व पिवळसर आढळले. रॅक व्यवस्थेत अपुरी जागा, प्रमाणापेक्षा जास्त उंची व सदोष डिझाइनमुळे स्वच्छतेत अडथळा येत आहे. खाद्यपदार्थ व अखाद्य साहित्य एकाच रॅकमध्ये एकत्र साठवून ठेवण्यात आले होते. अन्नपदार्थांचे खोके व साहित्याची पाकिटे थेट जमिनीवर अस्ताव्यस्त ठेवलेली आढळली. रॅकखाली मोठ्या प्रमाणात धूळ व कचरा होता; तसेच नियमित स्वच्छतेचे वेळापत्रक उपलब्ध नव्हते, असे तपासणीत आढळून आले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *