Headlines

2 लाख भाविक ‘भद्रा मारुती’ चरणी लीन:भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती, खुलताबादला दिवसभर ‘जय श्रीराम’ जयघोष‎




शनी अमावास्येच्या पवित्र पर्वानिमित्त खुलताबाद येथील प्रसिद्ध भद्रा मारुती मंदिरात शनिवारी पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. राज्यातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या २ लाख भाविकांनी भद्रा मारुतीचे दर्शन घेत आध्यात्मिक समाधानाचा अनुभव घेतल्याची माहिती संस्थानचे अध्यक्षमिठ्ठु पाटील बारगळ यांनी दिली. शनी अमावास्येला हिंदू धर्मात धार्मिक महत्त्व असल्याने मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. यंदाही पहाटे चार वाजल्यापासून मंदिर परिसरात भाविकांच्या रांगा लागण्यास सुरुवात झाली होती. सकाळ होताच गर्दीत मोठी वाढ झाली आणि मंदिर परिसर, मुख्य रस्ते तसेच पार्किंग परिसर भाविकांनी फुलून गेला. गर्दीने उच्चांक गाठला असताना पोलीस प्रशासन, मंदिर संस्थान व स्वयंसेवकांनी केलेल्या नियोजनामुळे दर्शन व्यवस्था सुरळीत सुरू होती. कडक उन्हामुळे दुपारी साडेबारा नंतर काही काळ गर्दीचे प्रमाण तुलनेने कमी झाल्याचे दिसून आले, मात्र दुपारी चारनंतर पुन्हा एकदा भाविकांची मोठी गर्दी मंदिर परिसरात दाखल झाली. रात्री उशिरापर्यंत दर्शनासाठी भक्तांची सतत रेलचेल सुरू होती. छत्रपती संभाजीनगर शहरासह कन्नड, गंगापूर, वैजापूर, पैठण, फुलंब्री, सिल्लोड, सोयगाव आदी तालुक्यांतून हजारो भाविक दर्शनासाठी आले होते. याशिवाय जालना, जळगाव, नाशिक, धुळे, बुलढाणा तसेच मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक भागांतून भक्तांनी भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. अनेकांनी कुटुंबासह दर्शन घेत नवस फेडले. पाण्याची सुविधा, वैद्यकीय मदत कक्ष भाविकांची संख्या लक्षात घेऊन मंदिर संस्थान आणि प्रशासनाकडून दर्शन रांगा शिस्तबद्ध राहाव्यात यासाठी लोखंडी बॅरिकेड्स उभारण्यात आले होते. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसह आलेल्या भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वैद्यकीय मदत केंद्र, आपत्कालीन सेवा तसेच स्वच्छतेकडेही लक्ष देण्यात आले होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *