Headlines

26/11 चा हल्ला हा भारताच्या सार्वभौमत्वावर आणि संविधानावर होता:दहशतवादाविरोधात भारताचा निर्धार कायम राहणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस




26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला हा केवळ ताज हॉटेल, ट्रायडेंट किंवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील हल्ला नव्हता, तर तो भारताच्या सार्वभौमत्वावर आणि संविधानावर केलेला हल्ला होता. या हल्ल्याला आपल्या जवानांनी आणि पोलिसांनी शौर्याने प्रत्युत्तर दिले. देशाने हा दिवस कधीही विसरता कामा नये. दहशतवादाविरोधात भारत एकजूट असून देशाच्या सुरक्षेला आव्हान देणाऱ्यांना भारत योग्य उत्तर देईल, असा ठाम निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या वतीने 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवान, पोलीस अधिकारी आणि निरपराध नागरिक तसेच पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवान आणि नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. कार्यक्रमाला उषा पेडणेकर, राहुल दुबाळे यांच्यासह पोलीस परिवारातील माता-भगिनी, पोलीस कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते. 26/11 चा हल्ला भारताच्या सार्वभौमत्वावर होता 26 नोव्हेंबर हा दिवस दोन कारणांसाठी महत्त्वाचा असल्याचे सांगत फडणवीस म्हणाले की, आज संविधान दिन आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला जगातील सर्वोत्तम संविधान अर्पण केले. त्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी आपण हे संविधान स्वीकारले. संविधान दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतानाच भारतीय संविधान चिरायू राहावे, अशी प्रार्थनाही त्यांनी केली. मात्र, याच दिवशी 2008 मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याची आठवणही आपल्याला होते. हा हल्ला केवळ मुंबईतील काही ठरावीक ठिकाणांवर झालेला हल्ला नव्हता, तर भारताच्या सार्वभौमत्वाला आव्हान देण्याचा आणि संविधानावर आघात करण्याचा प्रयत्न होता. दहशतवाद्यांनी जाणीवपूर्वक अशी ठिकाणे निवडली होती, जिथे जास्तीत जास्त जीवितहानी होईल. ताज आणि ट्रायडेंटसारख्या हॉटेलमध्ये विविध देशांचे नागरिक आणि परदेशी प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित असतात. त्यामुळे या ठिकाणांना लक्ष्य करून संपूर्ण जगाला भारतावर हल्ला झाल्याचा संदेश देण्याचा दहशतवाद्यांचा उद्देश होता, असे फडणवीस यांनी सांगितले. करकरे, कामटे, साळसकर, उन्नीकृष्णन आणि ओंबळेंच्या शौर्याला सलाम 26/11 च्या हल्ल्यावेळी मुंबई पोलिसांनी आणि जवानांनी दाखवलेल्या शौर्याचे स्मरण करताना फडणवीस यांनी शहीद पोलीस अधिकारी हेमंत करकरे, अशोक कामटे, विजय साळसकर तसेच एनएसजीचे मेजर संदीप उन्नीकृष्णन यांना अभिवादन केले. यासोबतच पोलीस शिपाई तुकाराम ओंबळे यांच्या अतुलनीय शौर्याचा विशेष उल्लेख केला. दहशतवादी अजमल कसाब याच्याकडे बंदूक होती, तर तुकाराम ओंबळे यांच्याकडे केवळ दंडुका होता. तरीही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी कसाबला पकडले. शरीरात गोळ्या घुसत असतानाही त्यांनी कसाबला सोडले नाही. कसाब जिवंत पकडला गेल्यामुळे पाकिस्तानचा दहशतवादातील सहभाग संपूर्ण जगासमोर आणणे शक्य झाले. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा चेहरा जगासमोर उघड झाला, असे फडणवीस म्हणाले. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने दाखवले रुद्र रूप पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचाही यावेळी फडणवीस यांनी उल्लेख केला. पहलगाममधील घटना मानवतेला काळिमा फासणारी होती. मात्र, त्यानंतर भारताने आपले रुद्र रूप दाखवून दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने दहशतवादाविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. उरी असो किंवा पहलगाम, भारताचे जवान आणि नागरिक यांच्यावर हल्ला झाल्यास भारत तो सहन करणार नाही. गरज पडल्यास पाकिस्तानच्या हद्दीत घुसूनही दहशतवाद्यांना प्रत्युत्तर दिले जाईल, हे भारताने दाखवून दिले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. इतिहासातून नेहमी शिकले पाहिजे आणि भविष्याचा वेध घेतला पाहिजे. जे समाज आपला इतिहास विसरतात, त्यांना वर्तमान असले तरी भविष्य नसते. त्यामुळे अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून शहीदांचे स्मरण करण्यासोबतच पुढील पिढीला इतिहासाची जाणीव करून देणेही महत्त्वाचे आहे, असे फडणवीस यांनी नमूद केले. गेल्या 12 वर्षांत दहशतवादी घटनांना आळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 12 वर्षांत मुंबईसह देशातील दहशतवादी घटनांना आळा घालण्यात यश आले आहे. दहशतवादाचे जाळे उखडून टाकण्यासाठी सुरक्षा यंत्रणा सातत्याने काम करत आहेत. पोलीस आणि जवानांच्या मदतीने सुरक्षित भारत घडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुंबई कधीही थांबली नाही आणि दहशतवाद्यांचे प्रयत्न मुंबई, महाराष्ट्र किंवा भारताचा निर्धार संपवू शकत नाहीत, हे देशाने दाखवून दिले आहे, असेही त्यांनी सांगितले. पोलीस बॉईज संघटनेच्या माध्यमातून पोलिसांचे प्रश्न मांडले जातात या कार्यक्रमात राहुल दुबाळे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न मांडल्याबद्दल फडणवीस यांनी त्यांचे कौतुक केले. गेल्या 10 वर्षांपासून राहुल दुबाळे कोणताही वैयक्तिक स्वार्थ न ठेवता पोलिसांचे प्रश्न सातत्याने मांडत आहेत. पोलीस दलाला इतर काही संघटनांप्रमाणे स्वतःची युनियन स्थापन करता येत नसल्याने त्यांच्या अडचणी आणि मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचे काम पोलीस बॉईज असोसिएशन करत आहे. सरकारचाही या समस्या सोडवण्याचा प्रयत्न असतो. यापूर्वीही अनेक प्रश्न मार्गी लावले असून सध्या मांडण्यात आलेल्या अडचणीही सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. बीडीडी चाळीतील पोलिसांना घरे देण्याचा निर्णय बीडीडी चाळीतील पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरांचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारने घेतलेल्या निर्णयाची माहितीही फडणवीस यांनी दिली. आपण पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून बीडीडी चाळीत राहणाऱ्या इतर नागरिकांप्रमाणे पोलिसांनाही घरे मिळाली पाहिजेत, अशी भूमिका मांडली होती. त्यानुसार पोलिसांना घरे देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर उर्वरित कर्मचाऱ्यांचाही विचार करण्यात आला. आता या संदर्भात काही नव्या अडचणी मांडण्यात आल्या असून त्या सोडविण्यासाठीही सरकार सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले. पोलीस भरतीचा विक्रम करण्याचा प्रयत्न आपल्या गृहमंत्रिपदाच्या कार्यकाळात आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वाधिक पोलीस भरती झाल्याचा अभिमान असल्याचे फडणवीस म्हणाले. यंदाची भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर देशात एक नवा विक्रम तयार होण्याची शक्यता आहे. पोलीस भरती, पोलीस पाल्यांचे प्रश्न, प्रशिक्षण आणि पोलीस कुटुंबांचे कल्याण या बाबींवर राज्य सरकार सातत्याने निर्णय घेत आहे. पोलिसांसाठी निर्णय घेताना नियम आणि कायद्याच्या चौकटीत राहून इतर कर्मचाऱ्यांवर होणारे परिणामही विचारात घ्यावे लागतात. मात्र, या सर्व प्रक्रियेत पोलिसांचा स्वतंत्र आणि विशेष विचार झाला पाहिजे, अशी सरकारची भूमिका आहे. त्यामुळे पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबांच्या कल्याणासाठी भविष्यातही विविध निर्णय घेतले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. पोलीस कुटुंबांसाठी कार्डियाक अॅम्ब्युलन्सचे लोकार्पण कार्यक्रमात राहुल दुबाळे यांच्या पुढाकारातून पोलीस कुटुंबीयांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या कार्डियाक अॅम्ब्युलन्सचे लोकार्पण करण्यात आले. ही सुविधा पोलीस परिवारासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रभर काम करणारी पोलीस बॉईज संघटना यापुढेही निस्वार्थपणे पोलिसांच्या सेवेसाठी कार्यरत राहील. संघटनेला आवश्यक असलेली मदत शासनाच्या वतीने निश्चितपणे केली जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. हेही वाचा…. 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याला 18 वर्षे:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून शहीदांना अभिवादन देशाच्या इतिहासातील काळा दिवस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज 18 वर्षे पूर्ण झाली. पाकिस्तानातून समुद्रमार्गे आलेल्या 10 दहशतवाद्यांनी मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य करत भीषण हल्ले केले होते. या हल्ल्यात अनेक निष्पाप नागरिकांसह मुंबई पोलिसांचे अधिकारी आणि कर्मचारी तसेच सुरक्षा दलातील जवानांना वीरमरण आले होते. दहशतवाद्यांशी लढताना देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या या वीरांच्या शौर्याचे आज संपूर्ण देश स्मरण करत आहे. 26/11 च्या 18 व्या स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयातील हुतात्मा स्मारक येथे शहीद पोलिसांना पुष्पचक्र अर्पण करून भावपूर्ण आदरांजली वाहिली. सविस्तर वाचा….



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *