![]()
एकल महिलांच्या आयुष्यात केवळ सहानुभूतीचे शब्द नव्हे, तर स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी महत्त्वाची आहे. हाच विचार केंद्रस्थानी ठेवून साऊ एकल महिला समिती अकोले तालुक्यात महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी काम करत आहे. महिलांना सन्मानाने जगण्याचा आधार देणारे हे कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार आमदार डॉ. किरण लहामटे यांनी काढले. राज्यातील १२० तालुक्यांत एकल महिलांसाठी कार्यरत असलेल्या साऊ एकल महिला समितीच्या अकोले तालुका कार्यालयाचे नव्या जागेत स्थलांतर करण्यात आले. या कार्यालयाचे उद्घाटन आमदार डॉ. लहामटे यांच्या हस्ते उत्साहात झाले. यावेळी सर्वपक्षीय राजकीय व सामाजिक कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने एकल महिला उपस्थित होत्या. अकोले तालुक्यात आतापर्यंत ४८ एकल महिलांचे स्वतंत्र व्यवसाय उभे करण्यात आले आहेत. आता किमान १०० महिलांना व्यवसायाच्या माध्यमातून स्वावलंबी करण्याचा समितीचा संकल्प आहे. महिलांना केवळ मदत देण्यापुरते मर्यादित न राहता त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि स्वतःचा व्यवसाय उभारण्यासाठी सक्षम करणे, हे समितीचे उद्दिष्ट असल्याचे समितीच्या नेत्या प्रतिमा हेरंब कुलकर्णी यांनी सांगितले. कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते मधुकरराव नवले, भाऊपाटील नवले, प्रा. बी. एम. महाले, अॅड. वसंतराव मनकर, हेरंब कुलकर्णी, जालिंदर वाकचौरे, डॉ. नितीन चासकर, डॉ. संदीप कडलग, सुशांत गजे, डॉ. अशोक भांगरे, डॉ. प्रतीक भांगरे, चंद्रकांत सरोदे, अरुण रुपवते, निवृत्त प्राचार्य अयाज शेख, नगरसेविका प्रतिभा मनकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. कार्यालयाच्या उद्घाटनाचे नियोजन वैशाली राजगुरू, सीमा भागवत, माधुरी वाकचौरे, रेखा कोटकर, कीर्ती पांगरे, वर्षा बेळे आणि समितीच्या अन्य सदस्यांनी केले. नव्या कार्यालयामुळे एकल महिलांना संघटित होण्यासाठी, रोजगाराच्या संधी मिळवण्यासाठी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे
Source link
48 महिलांच्या हाताला काम; 100 व्यवसायांचे ‘साऊ’चे लक्ष्य:अकोल्यात नव्या कार्यालयाचे उद्घाटन; स्वावलंबनाची साथ; एकल महिलांसाठी ‘साऊ’चा पुढाकार