.

येथून जवळच असलेल्या दापोरी गावात ६० फूट खोल असलेल्या कोरड्या विहिरीत एक गाय पडली होती. मात्र ‘वारसा’ संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून तिला जीवदान दिले. वारसा रेस्क्यू टिमच्या सदस्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन त्या गाईला कोणत्याही प्रकारची इजा होऊ न देता सुखरूप बाहेर काढले. या यशस्वी मोहिमेबद्दल सर्वत्र कौतुक केले जात आहे.
सामाजिक क्षेत्रात नेहमी अग्रेसर असणाऱ्या वारसा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अभिलाष व्यवहारे हे नेहमी अशा मदतीसाठी तत्पर असतात. गाय विहिरीत पडल्याची माहिती मिळताच ते आपल्या रेस्क्यू किटसह घटनास्थळी दाखल झाले. विहीर अतिशय लहान असल्यामुळे वरून आतमध्ये काहीही दिसत नव्हते. दरम्यान टॉर्च, बॅटरीचा वापर करून आधी खात्री करून घ्यावी लागली.
सध्या या गायीला मोर्शी येथील गोरक्षणमध्ये चारापाण्यासाठी रवाना करण्यात आले आहे. विशेष म्हणजे साठ फूट खोल विहिरीत पडूनही या गोमातेला कोणत्याही प्रकारचा मार लागला नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या कार्यासाठी गावातील जीवन होले, निलेश खोडकर, अमोल धानोरकर, बाबूभाऊ अंधारे, सुनील वानखडे, गजानन दाणे, प्रफुल फलके, अक्षय कडू, विजय करडे, स्वप्नील ढोमणे, ज्ञानेश्वर गेडाम, वृषभ कडू, गोपाल अंधारे, प्रफुल राऊत, अंकुश कोल्हे, गोपी बडोरे, भूषण चौधरी, हरिश कोल्हे, ज्ञानेश्वर डाखोरे, सागर पोटपिटे, यश गोळे, प्रणव वानखडे, विनीत नांदूरकर, नितीन चिखले, हर्षल गलफट यांनी परिश्रम घेतले.
वारसा संस्थेच्या रेस्क्यू टिमपैकी एका कार्यकर्त्याला त्यांनी विहिरीत उतरवले. त्यानंतर इतर सहकाऱ्यांनी मदत करून आतमध्ये पूरक साहित्य सोडले. गाईला व्यवस्थित दोराच्या साह्याने कोणत्याही प्रकारची इजा न होऊ देता बांधण्यात आले. नंतर तिला जेसीबी व गावकऱ्यांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. बाहेर काढल्यानंतर तिला कोणत्याही प्रकारची इजा किंवा मार लागला की नाही, याचीही खात्री करण्यात आली. दरम्यान गाय सुखरूप असल्याचे पाहून सर्वांनीच या मोहिमेबद्दल आनंद व्यक्त केला.