Headlines

महाराष्ट्रात 1.14 लाख कोटींची गुंतवणूक!:मुंबईत साकारणार देशातील मोठे 'एआय कॉम्प्युट हब', 2 हजार कामगारांना रोजगार




महाराष्ट्राच्या औद्योगिक आणि तंत्रज्ञान क्षेत्राला मोठी चालना देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज उद्योग विभाग आणि एएम इंटेलिजन्स लॅब्ज प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात 1 लाख 14 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा ऐतिहासिक सामंजस्य करार झाला. मुख्यमंत्री समिती कक्षात संपन्न झालेल्या या सामंजस्य करार सोहळ्यास उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. पी. अन्बळगण, उद्योग विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह, सहसचिव डॉ. श्रीकांत पुलकुंडवार, सहसचिव लक्ष्मीकांत ढोके तसेच ‘एएम इंटेलिजन्स लॅब्ज’चे अध्यक्ष अनिल चलमलाशेट्टी, संचालक मौर्य पायदा आणि उपाध्यक्ष पंकज कुमार आदी मान्यवर उपस्थित होते. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे राज्यामध्ये तब्बल 8 हजार प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. 2 हजार कामगारांना रोजगार या सामंजस्य करारामुळे मुंबई महानगर प्रदेशात (MMR) 1 लाख 14 हजार कोटी रुपयांच्या विक्रमी गुंतवणुकीतून ‘इंटिग्रेटेड ग्रीन डेटा सेंटर पार्क’ आणि ‘एआय कॉम्प्युट हब’ उभारले जाणार असून, हा प्रकल्प पूर्णपणे अक्षय ऊर्जेवर आधारित असल्याने शाश्वत विकासाला मोठी चालना मिळणार आहे. उच्च तंत्रज्ञान क्षेत्रातील या प्रकल्पामुळे सॉफ्टवेअर इंजिनिअर्स, डेटा सायंटिस्ट आणि ऑपरेशन्स टीममधील सुमारे 8 हजार कुशल व निमकुशल तरुणांना रोजगाराच्या प्रत्यक्ष संधी प्राप्त होतील, तर प्रकल्पाच्या उभारणीदरम्यान अतिरिक्त 2 हजार कामगारांना रोजगार उपलब्ध होणार आहे. 500 मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प 2 टप्प्यात होणार पूर्ण 500 मेगावॅट क्षमतेचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प दोन टप्प्यांत विकसित केला जाणार असून, यात 2 लाख 50 हजार उच्च क्षमतेच्या ‘एआय चिपसेट्स’चा वापर केला जाईल. ज्याचा 200 मेगावॅटचा पहिला टप्पा 2028 पर्यंत आणि 300 मेगावॅटचा दुसरा टप्पा 2030 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. राज्याच्या माहिती तंत्रज्ञान धोरण 2023 आणि हरित एकात्मिक डेटा सेंटर पार्क धोरण 2024 अंतर्गत साकारला जाणारा हा प्रकल्प महाराष्ट्राला कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात राष्ट्रीय व जागतिक स्तरावर अग्रस्थानी नेण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *