![]()
मुंबई महानगर गॅस पाईपलाईनचे पैसे थकीत असून तातडीने पैसे भरा असा संदेश देत एपीके फाईल पाठवून विज कंपनीच्या अधिक्षक अभियंत्याच्या खात्यातील १० लाख रुपये काढून घेतल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुरुवारी ता. ९ गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी या भामट्यांचा शोध सुरु केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली येथील विज वितरण कंपनीचे अधिक्षक अभियंता आर. एम. चव्हाण यांचे मुंबई येथे घर आहे. ता. ५ एप्रिल रोजी त्यांना एका मोबाईल क्रमाकांवरून संपर्क साधण्यात आला. संपर्क साधणाऱ्या व्यक्तीने त्याचे नांव दीपक जोशी असल्याचे सांगत तुमच्या घराचे महानगर गॅस पाईपलाईनचे पैसे थकलेले असून त्यामुळे कनेक्शन बंद करीत असल्याचे सांगितले. यावेळी चव्हाण यांनी थकीत रक्कम भरण्याची तयारी दर्शविली होती. त्यानुसार भामट्यांनी त्यांच्या मोबाईलवर एपीके फाईल पाठवली. सदर फाईल डाऊनलोड झाल्यानंतर भामट्यांनी चव्हाण यांना ओटीपी मागितला. यावेळी त्यांनी ओटीपी दिल्यानंतर भामट्यांनी मोबाईल बंद केला. त्यानंतर भामट्यांनी त्यांच्या बँक खात्यातून दोन वेळेस प्रत्येकी पाच लाख रुपये या प्रमाणे दहा लाख रुपयांची रक्कम काढून घेतली. दरम्यान, बँकेतून रक्कम काढण्यात आल्याबाबत चव्हाण यांच्या मोबाईलवर संदेश प्राप्त झाला नाही. मात्र त्यांनी त्यांचा ईमेल तपासल्यानंतर त्यात त्यांच्या बँक खात्यातून ता. ५ एप्रिल रोजी दोन वेळा व्यवहार झाल्याचे दिसून आले. या दोन्ही व्यवहारात प्रत्येक पाच लाख रुपये काढण्यात आल्याचेही दिसून आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच चव्हाण यांनी आज हिंगोली शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी दीपक जोशी नावाच्या भामट्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक संदीप मोदे, उपनिरीक्षक राहुल महिपाळे, जमादार अशोक धामणे, संजय मार्के, शेख मुजीब, गणेश लेकुळे, संतोष करे, शिवाजी ढोंबरे, जोगे, गणेश वाबळे पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी सायबर सेलची मदत घेण्याची तयारी सुरु केली असून, ज्या मोबाईलवरून चव्हाण यांच्याशी संपर्क साधण्यात आला तो मोबाईल कोणाच्या नावे आहेत याचा शोध पोलिसांनी सुरु केला आहे.
Source link
वीज कंपनीच्या अधिक्षक अभियंत्यांची 10 लाखांची फसवणूक:एपीके फाईल पाठवून काढले खात्यातील पैसे, हिंगोली पोलिसांत गुन्हा दाखल