Headlines

हिंगोलीत बाटली किंवा कॅनमध्ये इंधन देण्यास मनाई:जिल्हाधिकाऱ्यांचे पेट्रोलपंप चालकांना कडक आदेश, परवापासून होणार अंमलबजावणी




हिंगोली जिल्ह्यातील सर्व पेट्रोल-डिझेल पंप चालकांनी बाटली किंवा कॅनमध्ये इंधन देऊ नये असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले असून गुरुवारपासून ता. २१ या आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना पेट्रोलपंप चालकांना दिल्या आहेत. इंधनाचा अनधिकृत साठा होऊ नये आणि संभाव्य धोके टाळता यावेत, यासाठी जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. हिंगोली जिल्हयात मागील काही दिवसांपासून डिझेलचा तुटवडा निर्माण झाला आहे. जिल्हयातील ८६ पेट्रोल पंपावर आलेले डिझेल घेण्यासाठी वाहनधारक कॅन घेऊन रांगा लावत आहे. त्यामध्ये काही जणांकडून वाहन नसतांनाही कॅन भरून डिझेल घेतले जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे डिझेलचा अनाधिकृत साठा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या शिवाय डिझेलचा पुरवठा व मागणी यामध्ये मोठी तफावत निर्माण झाल्याने हा तुटवडा निर्माण झाला आहे. या प्रकारामुळे वाहनधारकांनाच डिझेल मिळणे सोईचे व्हावे यासाठी पुढील दोन दिवसानंतर कॅन किंवा बाटलीमध्ये इंधन देऊ नये असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा पुरवठा अधिकारी आप्पासाहेब पाटील यांनी काढले आहेत. पेट्रोल किंवा डिझेल प्लास्टिक बाटलीत किंवा कॅनमध्ये नेणे धोकादायक ठरू शकते, त्यामुळे पंपांवर केवळ वाहनांनाच इंधन पुरवठा करावा, अशा स्पष्ट सूचना पत्राद्वारे देण्यात आल्या आहेत. याशिवाय पेट्रोल पंपावर ग्राहकांना इतर सुविधा देखील अनिवार्य केल्या असून यामध्ये प्रामुख्याने ग्राहकांसाठी स्वच्छ आणि थंड पिण्याच्या पाण्याची मोफत सोय असावी, महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र आणि स्वच्छ प्रसाधनगृहांची व्यवस्था असणे बंधनकारक आहे, आपत्कालीन परिस्थितीसाठी पंपावर ‘फर्स्ट एड कीट’ तयार ठेवावे वाहनांमध्ये मोफत हवा भरण्याची यंत्रणा चालू स्थितीत असावी, ग्राहकांच्या तक्रारींसाठी तक्रार पुस्तिका आणि मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक दर्शनी भागात लावावेत सुरक्षेसाठी अग्निशमन यंत्रे आणि वाळूच्या बादल्या पूर्ण भरलेल्या असाव्यात. या सूचनांचे उल्लंघन केल्यास किंवा सुट्या स्वरूपात इंधन विक्री केल्याचे आढळल्यास, संबंधित पंप धारकावर अंतर्गत कडक कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी गुप्ता यांनी दिला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *