![]()
कल्याणमध्ये पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 34 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त केले आहेत. तसेच कुख्यात ड्रग्स माफिया अमजद यूसुफ पठाण याच्यासह पाच जणांना अटकही करण्यात आली आहे. यामुळे कल्याण अमली पदार्थ विरोधी पथकाला कुख्यात ड्रग्स माफिया तस्कर पठाण गँगच्या मुसक्या अवळण्यात मोठे यश आले आहे. तसेच मुंबई गोरेगाव नेक्सो घटनेतील धागेदोरे इथेही असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कल्याण अमली पदार्थ विरोधी पथकाने एका धडक कारवाईत कुख्यात पठाण गॅंगचा पर्दाफाश केला असून, तब्बल 34 कोटी रुपये किमतीचे 9 किलो हेरॉईन जप्त केले आहे. ठाणे जिल्ह्याच्या आजवरच्या इतिहासातील अमली पदार्थांविरोधातील ही सर्वात मोठी कारवाई ठरली आहे. याप्रकरणी कुख्यात ड्रग्स तस्कर आणि गँगचा म्होरक्या अमजद पठाण याच्यासह कासिफ वसईकर, सद्दाम शेख, कृष्णा हळेमणी आणि गणेश जंगमार उर्फ अण्णा या पाच जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अमजद पठाणच्या विरोधात 20 गंभीर गुन्हे सदर टोळीकडून नाशिकहून कल्याण मार्गे मुंबईत मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांची तस्करी केली जात होती आणि त्यानंतर ते कल्याण व मुंबई परिसरात वितरीत केले जात होते. अटकेत असलेल्या अमजद पठाणच्या विरोधात यापूर्वीही आंतरराज्यीय ड्रग्स तस्करी आणि हत्येसारखे तब्बल 20 गंभीर गुन्हे दाखल आहेत. या ड्रग्स तस्करीचे रॅकेट आणखी मोठे असण्याची दाट शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात असून, त्या दिशेने पुढील सखोल तपास सुरू आहे. पोलिसांच्या पथकाने अशी केली कारवाई कल्याण पश्चिमेकडील सांगळेवाडी परिसरात 1 एप्रिल रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास कल्याण अमली पदार्थ विरोधी पथकाची गस्त सुरू असताना, दोन व्यक्ती संशयास्पदरित्या फिरताना आढळून आल्या. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी हटकले असता, या दोघांनी तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तातडीने पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील बॅगेची झडती घेतली असता पोलिसांना मोठा धक्का बसला. कारण या बॅगेमध्ये तब्बल 9 किलो 236 ग्रॅम ‘हेरॉईन’ हा अमली पदार्थ आढळून आला. प्राथमिक तपासात कासिम वसईकर आणि कृष्णा हळेमणी अशी या पकडलेल्या दोन आरोपींची नावे असल्याचे निष्पन्न झाले. रॅकेटचा मुख्य सूत्रधार कुख्यात अमजद पठाण या कारवाईनंतर शहरात एखादी मोठी अमली पदार्थ तस्कर टोळी कार्यरत असल्याचा संशय बळावल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण अमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी अनिल गायकवाड आणि जितेंद्र ठोके यांच्या पथकाने या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला. या तपासादरम्यान, या ड्रग्स तस्करीच्या रॅकेटचा मुख्य सूत्रधार कुख्यात अमजद पठाण असल्याची माहिती समोर आली. याच तपासाच्या आधारे पोलिसांनी कारवाईची व्याप्ती वाढवत टोळीतील सद्दाम शेख आणि गणेश जंगमार या आणखी दोन साथीदारांनाही बेड्या ठोकल्या. ड्रग्सचे मोठे रॅकेट उद्ध्वस्त दरम्यान, या संपूर्ण रॅकेटचा मुख्य सूत्रधार अमजद पठाण हा इगतपुरी येथे लपून बसल्याची माहिती मिळताच, पोलिसांच्या पथकाने सापळा रचून त्याला बेड्या ठोकल्या. तो कासिम आणि सद्दामला ड्रग्स पुरवत असे आणि त्यांच्यामार्फत कृष्णा व गणेश हे त्याचे पुढे वितरण करत असल्याची प्राथमिक माहिती तपासात उघड झाली आहे. ही पठाण गॅंग प्रामुख्याने नाशिकहून कल्याणमार्गे मुंबईत अमली पदार्थांचा पुरवठा करत होती. कल्याण अमली पदार्थ विरोधी पथकाच्या या कर्तव्यदक्षतेमुळे कोट्यवधींच्या ड्रग्ससह कुख्यात तस्कर गजाआड झाले असून टोळीचा पूर्णपणे पर्दाफाश झाला आहे. ठाणे जिल्ह्याच्या इतिहासातील या सर्वात मोठ्या कारवाईमुळे अमली पदार्थ तस्करीचे मोठे रॅकेट उद्ध्वस्त होऊन त्यांचे कंबरडे मोडले गेले आहे.
Source link
कल्याणमध्ये पोलिसांची मोठी कारवाई:तब्बल 34 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त, पठाण गँगच्या म्होरक्यासह 5 जणांना ठोकल्या बेड्या