Headlines

पॉस मशीनवरून एप्रिलचा डेटा गायब:तीन महिन्यांच्या धान्य वाटपात तांत्रिक अडचणी, अचलपुरातील नागरिक त्रस्त




राज्य शासनाने एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांचे धान्य एकाच वेळी वितरित करण्याचे नियोजन केले होते. मात्र, अचलपूर तालुक्यात राशनधारकांना केवळ दोन महिन्यांचाच धान्यसाठा मिळत आहे. यामुळे राशनधारक आणि स्वस्त धान्य दुकानदार यांच्यात संभ्रम आणि नाराजी निर्माण झाली आहे. रेशन दुकानदार आणि काही ग्राहकांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वस्त धान्य दुकानांच्या पॉस मशीनवरील एप्रिल महिन्याचा डेटा नष्ट झाल्याने धान्य वितरणात अडचण येत आहे. धान्य पोहोचण्यापूर्वीच पॉस मशीनवरील डेटा डिलीट झाल्यामुळे तांत्रिक समस्या वाढल्या आहेत. गहू, तांदूळ आणि मका यांचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने प्रत्यक्ष वितरण केवळ दोन महिन्यांचेच होत आहे. केंद्र सरकारच्या प्रणालीमधून एप्रिल महिन्याचा डेटा डिलीट झाल्याचे सांगितले जात असून, राज्य शासनाने तो पुन्हा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात येत आहे. या तांत्रिक त्रुटीचा थेट फटका राशनधारकांना बसत आहे. अचलपूर तालुक्यात एकूण १६६ स्वस्त धान्य दुकाने असून, शहर परिसरात ४४ दुकानदार कार्यरत आहेत. सध्या सुमारे ७० टक्के राशनधारकांना पूर्ण धान्य मिळालेले नाही. तालुक्यासाठी अंदाजे ११ हजार ५०० क्विंटल गहू, तांदूळ आणि मक्याची आवश्यकता असताना, केवळ ८ हजार क्विंटल धान्यसाठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. तीन महिन्यांसाठी आवश्यक असलेला ३६ हजार क्विंटल धान्यसाठा अद्याप २२ हजार क्विंटलपर्यंतच पोहोचला आहे. पॉस मशीनवरील तांत्रिक अडचणी आणि धान्य वेळेवर न पोहोचल्याने राशनधारक व स्वस्त धान्य दुकानदारांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. शासनाने तातडीने ही समस्या सोडवावी, तसेच धान्य वितरणात दिरंगाई करणाऱ्या यंत्रणेची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *