Headlines

सुनेत्रा पवारांच्या भेटीसाठी नेत्यांची गर्दी:विधान परिषदेसाठी मुलं, नातेवाईकांसाठी लॉबिंग; देवगिरीवर राजकीय खलबतं रंगली




राज्यातील विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून मुंबईतील देवगिरी बंगल्यावर नेत्यांच्या गाठीभेटी वाढल्या आहेत. विविध मतदारसंघांतील जागा आपल्या पक्षाला किंवा समर्थकांना मिळाव्यात यासाठी महायुती आणि इतर पक्षांतील नेते जोरदार लॉबिंग करत असल्याचे चित्र दिसत आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी अनेक इच्छुक नेत्यांनी हजेरी लावल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी नेते सक्रिय झाल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांनीही देवगिरी बंगल्यावर जाऊन सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. त्यांच्या या भेटीमुळे त्या विधान परिषदेसाठी इच्छुक असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. आक्रमक भाषणशैलीमुळे ओळखल्या जाणाऱ्या सक्षणा सलगर यांनी धाराशिव जिल्ह्यातील छोट्या गावातून राजकारणात प्रवेश केला होता. वयाच्या 21 व्या वर्षी त्या 2012 मध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या. त्यानंतर 2017 मध्ये पुन्हा त्यांना संधी मिळाली आणि 2018 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली होती. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत सक्षणा सलगर यांनी महायुतीविरोधात आक्रमक प्रचार करत राज्यभरात लक्ष वेधले होते. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्या तुळजापूर मतदारसंघातून इच्छुक होत्या. मात्र, त्यांना उमेदवारी मिळाली नव्हती. सुप्रिया सुळे यांच्या निकटवर्तीय म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे त्यांची सुनेत्रा पवार यांच्यासोबतची भेट महत्त्वाची मानली जात आहे. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याने त्यांच्या नावाची चर्चा अधिक रंगू लागली आहे. दरम्यान, नांदेड मतदारसंघाच्या जागेसाठीही हालचाली वाढल्या आहेत. आमदार प्रतापराव चिखलीकर यांनी देवगिरी बंगल्यावर जाऊन सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. नांदेडची विधान परिषद जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला यावी, अशी भूमिका त्यांनी मांडल्याची माहिती समोर आली आहे. नांदेड जिल्ह्यात अशोक चव्हाण आणि प्रतापराव चिखलीकर यांच्यातील राजकीय संघर्ष अनेकदा चर्चेत राहिला आहे. त्यामुळे या जागेवर अंतिम निर्णय कोणाच्या बाजूने होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हिंगोली-परभणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेसाठीही रस्सीखेच सुरू झाली आहे. शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेत आपल्या मुलगा अभिमन्यू खोतकर यांच्यासाठी उमेदवारीची मागणी केली आहे. सुरुवातीला मुलगी दर्शना खोतकर यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, नंतर अभिमन्यू खोतकर इच्छुक असल्याचे स्पष्ट करण्यात आले. भेटीनंतर बोलताना अर्जुन खोतकर यांनी आपण मतदारसंघातील कामांसाठी भेट घेतल्याचे सांगितले. तसेच उमेदवारीबाबत अंतिम निर्णय पक्षप्रमुख एकनाथ शिंदे आणि पक्ष नेतृत्व घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. वर्षा निवासस्थानी महायुतीची महत्त्वाची बैठक महायुतीत अद्याप जागावाटपावर अंतिम निर्णय झालेला नसल्याने तिढा कायम आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने हिंगोली-परभणी, पुणे आणि रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग या 3 जागांवर दावा केला आहे. दुसरीकडे शिवसेना आणि भाजप यांच्यातही काही जागांवरून चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वर्षा निवासस्थानी महायुतीची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि मंत्री उदय सामंत उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत विधान परिषद निवडणुकीचा तिढा सुटणार का, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *