Headlines

एमआयटी डब्ल्यूपीयूमध्ये ई-मोबिलिटी सेंटर ऑफ एक्सलन्स सुरू:स्टार्टअप, उद्योग व विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणासाठी महत्त्वाचे पाऊल




एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी (एमआयटी डब्ल्यूपीयू) येथे इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी ‘सेंटर फॉर एक्सलन्स इलेक्ट्रिक व्हेइकल्स’ची स्थापना करण्यात आली आहे. या केंद्राच्या माध्यमातून इलेक्ट्रिक वाहने आणि संबंधित तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात संशोधन, विकास आणि कौशल्य विकासावर भर दिला जात आहे. माईर्स एमआयटीचे संस्थापक व सेंटर फॉर एक्सलन्स इलेक्ट्रीक व्हेइकल्सचे संचालक प्रा. प्रकाश जोशी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या केंद्रांतर्गत टीबीआय सेंटरमध्ये सध्या ३ यशस्वी स्टार्टअप कार्यरत आहेत, तर ४५ वेगवेगळ्या स्टार्टअप्सवर काम सुरू आहे. ज्यांना स्वतःचे स्टार्टअप सुरू करायचे आहे, त्यांना हे सेंटर सर्वतोपरी मदत करेल, असे प्रा. जोशी यांनी सांगितले. यावेळी एमआयटी टीबीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद गोरे, ईअ‍ॅण्डटीसीच्या विभाग प्रमुख प्रा. डॉ. पारुल जाधव व सहयोगी प्राध्यापक डॉ. साकेत येवलेकर उपस्थित होते. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी विभागाच्या माध्यमातून हे सेंटर कार्य करते. शैक्षणिक ज्ञान आणि वेगाने विकसित होणाऱ्या इलेक्ट्रिक वाहन उद्योगातील दरी कमी करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. तसेच उद्योग व शैक्षणिक संस्थांमधील सहकार्याला प्रोत्साहन देणे आणि ईव्ही तंत्रज्ञानाबद्दल जागरूकता वाढवणे आवश्यक आहे, असेही प्रा. जोशी यांनी नमूद केले. डॉ. पारुल जाधव यांनी सांगितले की, हे सेंटर प्रकल्प विकास, सहयोगी संशोधन, करिअर कौन्सिलिंग, विद्यार्थी व प्राध्यापकांचे प्रशिक्षण, उद्योगांशी सल्लामसलत, स्टार्टअप सहाय्य आणि ईव्ही क्षेत्रातील संशोधन व विकासावर विशेष कार्य करते. नव्या युगात इलेक्ट्रिक कार्सची वाढ झपाट्याने होत आहे. भविष्यात हायब्रीड व्हेइकल्स, इलेक्ट्रिक कार्स आणि हायड्रोजन कार्ससारखे अनेक पर्याय उपलब्ध होतील. हे क्षेत्र लवकरच मोठा टप्पा गाठेल. प्रसाद गोरे यांनी माहिती दिली की, एमआयटी टीबीआय सेंटरच्या माध्यमातून आतापर्यंत जवळपास ७५ स्टार्टअप्सना सहकार्य करण्यात आले आहे. शिक्षण, कृषी, स्पेस आणि आयटी यांसारख्या क्षेत्रांमध्ये स्टार्टअप्स सुरू करण्यास मदत केली जाईल. उद्योजक बनू इच्छिणाऱ्यांना प्रोत्साहन दिले जाईल आणि येथे लॅब टेस्टिंग तसेच तज्ज्ञ सल्लागार उपलब्ध आहेत. डॉ. साकेत येवलेकर म्हणाले की, उद्योग क्षेत्रातील वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी जागतिक दर्जाची पायाभूत सुविधा आणि व्यावहारिक प्रशिक्षण उपलब्ध करून दिले जात आहे. प्रशिक्षण सत्रे, कार्यशाळा, इंटर्नशिप, परिसंवाद आणि तज्ज्ञांची व्याख्याने यांसारख्या विशेष कार्यक्रमांद्वारे विद्यार्थी व उद्योग व्यावसायिकांना इलेक्ट्रिक मोबिलिटीमधील अद्ययावत ज्ञान व कौशल्ये प्रदान केली जात आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *