![]()
येथील उपजिल्हा रुग्णालयातील वाढत्या गैरकारभाराची अखेर राज्यस्तरावर गंभीर दखल घेण्यात आली आहे. आरोग्यमंत्री आबिटकर यांच्या आदेशान्वये वरिष्ठ मेडिकल टीमने सोमवारी अचानक रुग्णालयात दाखल होत सखोल पाहणी केली. या पाहणीदरम्यान रुग्णालयातील अनेक गंभीर त्रुटी समोर आल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांना धारेवर धरत शिस्तीचे पालन करण्याची कडक तंबी देण्यात आली. काही महिन्यांपासून कळवण उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्यसेवेबाबत नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी होती. रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत होत्या. किरकोळ आजार असतानाही रुग्णांना नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठवले जात होते. याशिवाय रुग्णालयात आवश्यक औषधांचा तुटवडा, स्वच्छतेचा अभाव, काही विभागांतील निष्काळजीपणा तसेच काही कर्मचाऱ्यांकडून रुग्ण व नातेवाईकांशी उद्धट व अपमानास्पद वर्तन होत असल्याच्या तक्रारीही वारंवार पुढे येत होत्या. या सर्वबाबींमुळे शिवसेनेचे तालुकाप्रमुख शरद पगार व त्यांच्या सहकाऱ्यांनी संबंधित प्रश्न वरिष्ठ स्तरावर लावून धरले होते. नागरिकांकडून आलेल्या तक्रारींचे निवेदन देत रुग्णालयातील चुकीच्या कारभारावर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. दरम्यान, मोहाडी येथे आयोजित शिवसेना शिवसंवाद दौऱ्यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासमोरही कळवण उपजिल्हा रुग्णालयातील गंभीर परिस्थिती मांडण्यात आली. रुग्णांची हेळसांड, कर्मचाऱ्यांची अरेरावी आणि आरोग्यसेवेतील काही डॉक्टरांकडून रुग्ण नाशिक पाठविणे, कामाबाबत निष्काळजीपणाची माहिती देण्यात आल्यानंतर खासदार डॉ. शिंदे यांनी तत्काळ दखल घेत आरोग्यमंत्री आबिटकर यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश देत तातडीने प्रत्यक्ष पाहणी करण्याच्या सूचना दिल्या. या आदेशानुसार आरोग्यमंत्र्यांचे ओएसडी डॉ. सांगळे (सर्जन, जळगाव) यांनी अचानक कळवण उपजिल्हा रुग्णालयात भेट देत विविध विभागांची सविस्तर तपासणी केली. अचानक झालेल्या या पाहणीमुळे रुग्णालय प्रशासनाची एकच तारांबळ उडाली. यावेळी रुग्णालयातील ओपीडी, आपत्कालीन विभाग, औषध वितरण केंद्र, स्वच्छता व्यवस्था, कर्मचारी उपस्थिती, रुग्ण नोंदी तसेच उपलब्ध वैद्यकीय सुविधा यांची तपासणी करण्यात आली. डॉ. सांगळेंनी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांशी थेट संवाद साधून प्रत्यक्ष समस्या जाणून घेतल्या. अनेक रुग्णांनी वेळेवर उपचार मिळत नसल्याची, काही कर्मचाऱ्यांकडून अरेरावीची भाषा वापरली जात असल्याची व किरकोळ कारणांवरून रुग्णांना नाशिकला हलवले जात असल्याची तक्रार केली. काही रुग्णांनी औषधे बाहेरून खरेदी करावी लागत असल्याची व्यथाही मांडली. दरम्यान, या पाहणीनंतर संबंधित दोषींवर कारवाई होणार का, तसेच रुग्णालयातील समस्या कितपत मार्गी लागणार, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. हलगर्जीपणा किंवा दुर्लक्ष सहन केले जाणार नाही पाहणीदरम्यान अनेक ठिकाणी निष्काळजीपणा आढळून आल्याने संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना चांगलेच फैलावर घेण्यात आले. रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे. कोणत्याही प्रकारची अरेरावी, हलगर्जीपणा किंवा दुर्लक्ष सहन केले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा यावेळी देण्यात आला. तसेच रुग्णालयात शिस्त राखून आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या.
Source link
रुग्णांच्या तक्रारींची दखल; कळवणच्या उपजिल्हा रुग्णालयात पथकाची धडक:अचानक पाहणीत अनेक त्रुटी उघड; अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिली तंबी