![]()
कजगावसह परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या तीव्र इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता बाटली, कॅन तसेच इतर कोणत्याही खुल्या भांड्यात पेट्रोल व डिझेल देण्यास प्रशासनाने कडक बंदी घातली आहे. या आदेशानंतर कजगाव परिसरातील अनेक पेट्रोल पंपांवरील गर्दी ओसरली असून तिथे शुकशुकाट पाहायला मिळत आहे. या निर्णयामुळे सामान्य वाहनधारकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असला, तरी यापूर्वी मोठ्या प्रमाणावर इंधन साठवून कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. काही पंपांवर रात्रीच्या वेळी कॅनद्वारे छुप्या पद्धतीने इंधन विक्री होत असल्याच्या चर्चा होत्या.यामुळे प्रत्यक्ष गरज असलेल्यावाहनधारकांना इंधन मिळणे कठीण झाले होते आणि काळाबाजार वाढण्याची भीती व्यक्त होत होती. जिल्हाधिकाऱ्यांच्या नवीन आदेशानंतर आता पेट्रोल पंप चालकांनी बाटली व कॅनमध्ये इंधन देणे पूर्णपणे थांबवले आहे. मात्र, यापूर्वी ज्यांनी मोठ्या प्रमाणावर इंधन साठवून कृत्रिम टंचाई निर्माण केली, त्यांच्यावर प्रशासन कोणती कारवाई करणार असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. सर्वसामान्य, शेतकरी संकटात.. इंधन टंचाईमुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, छोटे व्यावसायिक तसेच प्रवासी वर्ग मोठ्या अडचणीत सापडला आहे. सध्या ही परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी आणि इंधन पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा कजगाव परिसरातील जनतेकडून व्यक्त केली जात आहे. दोनच दिवसांपूर्वी टंचाईची होती परिस्थिती.. गेल्या दोन दिवसांपुर्वी कजगाव परिसरात पेट्रोल व डिझेलचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता अनेक पेट्रोल पंपांवर मशीन बंद आहे किंवा इंधन उपलब्ध नाही असे फलक लावण्यात आले होते. काही ठिकाणी वाहनधारकांना केवळ दोनशे रुपयांपर्यंतच मर्यादित पेट्रोल दिले जात असल्याने नागरिकांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागत होते.
Source link
बाटली, कॅनमध्ये इंधन विक्री बंद; कजगाव पेट्रोल पंपांवर शुकशुकाट:काळ्याबाजाराची चौकशी करण्याची वाहनधारकांची मागणी