![]()
अधिक मासातील पवित्र मानल्या जाणाऱ्या कमला एकादशी पर्वानिमित्त दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पैठणनगरीत बुधवारी भक्तीचा महासागर उसळला. गोदावरी नदीत पवित्र स्नान व संत एकनाथ महाराजांच्या समाधी दर्शनासाठी राज्यभरातून आलेल्या तब्बल एक लाखाहून अधिक भाविकांनी शहरात गर्दी केली. पहाटेपासूनच नागघाट, भद्रकाली घाटासह विविध घाटांवर भाविकांची मोठी रांग लागली होती. गेल्या वर्षीपेक्षा दुप्पट गर्दी होती. अधिक मासाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. या काळात जप, तप, दानधर्म, नामस्मरण, हरिनाम सप्ताह, प्रवचने व कीर्तनांना विशेष प्राधान्य दिले जाते, कमला एकादशीच्या दिवशी गोदावरी स्नान व उपवास केल्यास पुण्यप्राप्ती होते, अशी श्रद्धा असल्याने मराठवाड्यासह राज्याच्या विविध भागांतून हजारो भाविक पैठणमध्ये दाखल झाले होते. गोदावरी स्नानानंतर भाविकांनी संत एकनाथ महाराज समाधी मंदिर येथे दर्शन घेत आध्यात्मिक समाधान लाभल्याची भावना व्यक्त केली. मंदिर परिसरात दिवसभर हरिनाम सप्ताह, भजन-कीर्तन, प्रवचन आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संत एकनाथ महाराजांच्या अभंगांनी परिसर भक्तिमय झाला होता. नाथ मंदिरात गर्दीचे नियोजन : एकादशीनिमित्त नाथ समाधी मंदिरात मोठी गर्दी झाली होती. या गर्दीचे नियोजन कार्यकारी विश्वस्त दादा बारे व शहादेव लोहारे यांनी केले. तसेच पोलिस निरीक्षक महादेव गोमारे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. गोदावरीत शुद्ध पाणी; भाविकांमध्ये समाधान कमला एकादशीनिमित्त गोदावरी बंधाऱ्यात शुद्ध पाणी सोडण्यात आल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले. पवित्र स्नानासाठी आलेल्या भाविकांनी स्वच्छ पाण्यामुळे आनंद व्यक्त केला. आज एकादशीनिमित्ताने पैठणलगतच्या गावांतील भक्त, भाविक पायी दिंडी करत नाथांच्या दर्शनासाठी आले होते. वारकऱ्यांसाठी थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अधिक मास व आषाढीपूर्वी येणारी मोठी एकादशी असल्याने नाथ समाधी मंदिर पहाटेपासूनच गजबजून गेले होते. दर्शनासाठी भाविकांना सुमारे अर्धा तास प्रतीक्षा करावी लागली. नाथ संस्थानच्या वतीने वारकऱ्यांसाठी थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. प्रशासन व मंदिर संस्थानच्या वतीने सुरक्षा, स्वच्छता व भाविकांच्या सोयी-सुविधांकडे विशेष लक्ष देण्यात आले.
Source link
गोदाकाठी एक लाख भाविकांची गर्दी:अधिक मासानिमित्त पैठणला भक्तीचा महासागर; गेल्या वर्षापेक्षा दुप्पट गर्दी