![]()
वसमत ते वाखारी मार्गावर बाभूळगाव शिवारात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या दोन हायवा सह 55 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणी चौघांवर वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात बुधवारी ता. 27 गुन्हा दाखल झाला आहे. हिंगोली जिल्ह्यात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी महसूल विभागाचे तर पोलिस अधीक्षक निलाभ रोहन यांनी पोलिस विभागाचे पथक नियुक्त केले आहे. या पथकाकडून दिवसा व रात्रीच्या वेळी वाळू घाटाच्या मार्गावर अचानक वाहनांची तपासणी केली जात आहे. या शिवाय कालव्याच्या मार्गावरून येणाऱ्या वाहनांचीही तपासणी केली जात आहे. दरम्यान, वसमत ते वाखारी मार्गावर बाभूळगाव जवळील कालव्याच्या बाजूने दोन हायवामध्ये वाळू भरून आणली जात असल्याची माहिती वसमत ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. त्यावरून सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन बोराटे, जमादार विजयकुमार उपरे, आंबादास विभुते, नामदेव बेंगाळ यांच्या पथकाने बुधवारी ता. 27 मध्यरात्री वाहनांची तपासणी केली. यावेळी दोन हायवामध्ये वाळू भरून वाहतूक केली जात असल्याचे दिसून आले. पोलिसांनी चालकांकडे वाळू वाहतुकीचा परवाना तसेच आवश्यक कागदपत्रांची मागणी केली असता त्यांना कागदपत्रे दाखविता आली नाही. त्यावरून पोलिसांनी दोन हायवा व वाळू असा 55 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात आणला. या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक बोराटे यांच्या तक्रारीवरून वसमत ग्रामीण पोलिसांनी सिध्दोधन खाडे(रा. पळशी ता. वसमत), मुंजाजी नरवाडे (रा. रुपला पांढरी, जि. पुर्णा) यांच्यासह आर. जे. इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी व जय साई कंन्स्ट्रक्शन कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल केला आहे. जमादार विजयकुमार उपरे पुढील तपास करीत आहेत.
Source link
वसमत ग्रामीण पोलिसांची अवैध गौण खनिज वाहतुकीवर कारवाई:55 लाखांचा मुद्देमाल जप्त, गुन्हा दाखल