![]()
छत्रपती संभाजीनगर शहरातील उच्चभ्रू परिसरात गणना होणाऱ्या विद्यानगर भागात एक भव्य आध्यात्मिक केंद्र आकारास येत आहे. ९० च्या दशकात स्थापन झालेल्या या वसाहतीत पूर्वी छोट्या स्वरूपात असलेले हनुमान मंदिर आता लोकसहभागातून भव्य रूप घेत आहे. सुमारे २ कोटी रुपयांच्या खर्चातून ६०० स्क्वेअर फुटांचे हे देखणे मंदिर उभारले जात आहे. यामध्ये अष्टविनायक, हनुमान आणि महादेवांचे दर्शन घडणार आहे. जालना रोड परिसरातील विद्यानगर येथे १९८९-९० च्या दशकात ९५ प्लॉटधारकांची वसाहत निर्माण झाली. याच भागात विजयनगरचे ७० प्लॉटधारकही वास्तव्यास आहेत. येथील स्थानिक नागरिकांना दर्शनासाठी जागृत हनुमान विश्वस्त मंडळा मार्फत पूर्वी हनुमान मंदिराची उभारणी करण्यात आली होती. येथील हनुमानाची मूर्ती नेवासा येथून आणण्यात आली होती. दिवसेंदिवस वसाहतीचा विस्तार वाढला. भाविकांची श्रद्धा दृढ होत गेली. त्यामुळे सर्व रहिवाशांनी एकत्र येत मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा संकल्प केला. तीन मंदिरे अन् साडेतीन हजार स्क्वेअर फुटांचे सभागृह : जीर्णोद्धार होत असलेल्या या ६०० स्क्वेअर फुटांच्या क्षेत्रात एकूण तीन मंदिरे असणार आहेत. यामध्ये मुख्य जागृत हनुमान मंदिर ११ बाय १२ स्क्वेअर फूट असेल. मुख्य मंदिराच्या उजव्या बाजूला अष्टविनायक गणेश मंदिर (११ बाय ११ स्क्वेअर फूट) असेल. डाव्या बाजूला महादेव मंदिर (११ बाय ११ स्क्वेअर फूट) साकारण्यात येत आहे. या गाभाऱ्यांच्या समोरच मंत्री अतुल सावे यांच्या आमदार निधीतून ४० लाख रुपये खर्चाचे साडेतीन हजार स्क्वेअर फुटांचे भव्य सभागृह मंजूर करण्यात आले आहे. प्लास्टरमध्ये सुंदर नक्षीकाम होणार मंदिराचा रंग फिकट गुलाबी असेल. प्लास्टरच्या माध्यमातून आकर्षक कार्व्हिंग (नक्षीकाम) केले जाईल. शिखराची रचना प्लेन, चौकोनी स्वरूपाची असेल. – किशनसिंग कागणे , शिल्पकार वर्षभरात मंदिराचे काम पूर्ण करणार भाविकांना एकाच ठिकाणी हनुमान, महादेव, अष्टविनायकांचे दर्शन व्हावे या उद्देशाने लोकसहभागातून हे काम सुरू आहे. येत्या वर्षभरात मंदिराचे काम पूर्ण होईल. – अर्जुन गायके , अध्यक्ष
Source link
नवनिर्माण:विद्यानगरात 2 कोटींतून साकारतेय आध्यात्मिक केंद्र; एकाच छताखाली घडणार तीन देवतांचे दर्शन