Headlines

बांधकाम कामगारांच्या अर्जांची तपासणी प्रक्रिया सुरू करा:बिल्डिंग पेंटर्स बांधकाम मजूर असोसिएशनची मागणी‎




इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकृत लाभार्थींच्या अर्जांची तपासणी प्रक्रिया गेल्या जवळपास एक वर्षापासून स्थगित असल्याचा आरोप बिल्डिंग पेंटर्स बांधकाम मजूर असोसिएशनने केला आहे. तपासणीची प्रक्रिया तातडीने सुरू करण्याची मागणी असोसिएशनने केली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष शैलेश शंकरराव सूर्यवंशी व सचिव पंचशील गजघाटे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन सादर करण्यात आले. इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या नोंदणी व नूतनीकरण प्रक्रियेसाठी शासनाने नवीन प्रणाली लागू केली. या प्रक्रियेत स्थानिक आमदारांच्या नियंत्रणाखाली समिती स्थापन करण्याची अधिसूचना जाहीर करण्यात आली होती. मात्र ही नवीन प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी प्रशासनाला सहा ते आठ महिन्यांचा कालावधी लागला, असे असोसिएशनचे म्हणणे आहे. त्यामुळे गत दहा ते बारा महिन्यांपासून ऑनलाईन अर्ज दाखल करूनही नोंदणी व नूतनीकरणाची प्रक्रिया पूर्ण होऊ शकलेली नाही. परिणामी, नोंदणीकृत लाभार्थी व असंघटित बांधकाम मजुरांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळत नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदन सादर करताना सचिव पंचशील गजघाटे, महिला जिल्हाध्यक्षा अनुराधा ढिसाळे, कल्पना सूर्यवंशी, सुनीता गजघाटे, देवका सिरसाट, प्रकाश तेलगोटे, संदीप नरवणे, विशाल घायवट, निशिकांत सरदार, सचिन तायडे, अनिल तायडे, भास्कर सोनोने, सुनील तायडे, अजिंक्य सूर्यवंशी, सह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. पात्र अर्जदारांना लाभ द्या नवीन अधिसूचनेनुसार समितीची प्रक्रिया निष्क्रिय करून मंडळाच्या कर्मचाऱ्यांमार्फत कार्यालयीन कामकाज पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आल्याचेही निवेदनात सांगण्यात आले. तरीही प्रलंबित अर्जांची तातडीने तपासणी करावी. पात्र लाभार्थींना योजनांचा लाभ मिळावा. यंत्रणा अधिक गतिमान करण्यासाठी आवश्यक निर्देश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात प्रशासनाने लवकर निर्णय घ्यावा. लाभार्थींना दिलासा द्यावा, अशी मागणी केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *