![]()
गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात शिवसेना ठाकरे गटाचे काही खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा असून लवकरच मोठे पक्षांतर होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यातच ऑपरेशन टायगर सुरू असल्याच्या चर्चा देखील सुरू आहेत. यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली. अनिल देशमुख म्हणाले, असे आहे की या सर्व बातम्या पेरल्या जातात. त्यामुळे ऑपरेशन टायगर कुठेही अस्तित्वात नाही. आणि ज्या पद्धतीने एकजुटीने सर्व ठाकरे गटाचे खासदार उद्धवजी ठाकरे यांच्या पाठीमागे आहेत त्यामुळे असे घडणार नाही, अशी मला खात्री आहे, असे देशमुख यांनी म्हटले आहे. खासदारांसोबत माझी कोणतीही बैठक झालेली नाही- एकनाथ शिंदे दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाच्या खासदारांसोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक झाल्याचेही बोलले जात आहे. यावर खुद्द शिंदेंनीच स्पष्टीकरण देत अशी कुठलीही बैठक झाली नसल्याचे स्पष्ट केले आहे. ते म्हणाले, गेल्या दीड वर्षांपासून अशा प्रकारच्या बातम्या मुद्दाम पसरवल्या जात आहेत. परंतु, या बातम्यांमध्ये काडीचेही तथ्य नाही. केवळ राजकीय गैरसमज आणि सनसनाटी निर्माण करण्यासाठी अशा वावड्या उठवल्या जात आहेत. पुढे बोलताना एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, उबाठाच्या खासदारांसोबत माझी कोणतीही बैठक झालेली नाही. अशी कोणतीही बैठक झाली नाही आणि त्या केवळ अफवा आहेत. अशा प्रकारचे वृत्त पूर्णपणे निराधार असून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले आहे. उबाठाकडून लोकप्रतिनिधींची बदनामी- नरेश म्हस्के शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, अशा पद्धतीची कुठलीही बैठक झालेली नाही, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. त्यांच्या पक्षाचे आमदार-खासदार आमच्याकडे घेण्याची गरज वाटत नाही. काही नाराजी असेल तर आमदार-खासदारांची बदनामी उबाठाच्या नेत्यांनी करू नये, असा खोचक सल्लाही म्हस्के यांनी दिला आहे. पुढे बोलताना नरेश म्हस्के म्हणाले की, दिल्लीमध्ये महाराष्ट्रातील जवळपास सर्वच खासदार एकत्र असतात. आपल्या राज्यातील मंत्र्यांने चहा पानाला बोलावले तर जातात. प्रतापराव जाधवांकडे जेवनासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सुद्धा खासदार होते. त्यामुळे काहीही बातम्या पसरू नये. अरविंद सावंत यांचे पक्षातील विरोधक त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत असावे. उबाठातीलच काही लोकं या अफवा पसरवत लोकप्रतिनिधींना बदनाम करत आहेत.
Source link
ऑपरेशन टायगर कुठेही अस्तित्वात नाही:सगळे खासदार उद्धव ठाकरेंच्या पाठीशी एकजुटीने उभे, अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया