Headlines

गुरुदेवनगरात मध्यरात्री घरफोडी:6 लाख 27 हजार रुपयांची रोकड लंपास, अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल




तिवसा शहरातील गुरुदेव नगर परिसरात मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी एका घरात धाडसी घरफोडी केली आहे. या घटनेत हेमराज उर्फ हेमंत सुरेशराव बोबडे यांच्या घरातून तब्बल ६ लाख २७ हजार रुपयांची रोकड लंपास करण्यात आली. ही खळबळजनक घटना २ जूनच्या रात्री घडली असून, पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हेमराज उर्फ हेमंत सुरेशराव बोबडे (वय ४०) हे गुरुदेव नगर येथील सेवा शांती चाळीत राहतात. ते शेती आणि ट्रक व्यवसायात आहेत. बोबडे तळमजल्यावर राहतात, तर त्यांची आई वरच्या मजल्यावर एकटी राहते. त्यांची पत्नी प्रसुतीसाठी गेल्या चार महिन्यांपासून माहेरी असल्याने घरात वर्दळ कमी होती. बोबडे यांनी ले-आऊट व्यवहार आणि ट्रक भाड्याच्या उत्पन्नातून मिळालेली ६ लाख २७ हजार रुपयांची रक्कम बेडरूममधील लाकडी कपाटात ठेवली होती. याशिवाय, दुसऱ्या खोलीतील लोखंडी कपाटात ७० हजार रुपये आणि सोन्याचे दागिने ठेवण्यात आले होते, जे चोरट्यांच्या हाती लागले नाहीत. २ जून रोजी रात्री सुमारे १०.३० वाजता बोबडे मित्रासोबत कामानिमित्त अमरावतीला गेले होते. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाज्याचे कडी-कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यांनी थेट बेडरूम गाठत लाकडी कपाट उघडून त्यातील संपूर्ण रोकड लंपास केली. त्यानंतर चोरट्यांनी दुसऱ्या बेडरूममधील लोखंडी कपाट फोडण्याचा प्रयत्न केला, मात्र तो निष्फळ ठरला. ३ जून रोजी पहाटे सुमारे ३ वाजता बोबडे घरी परतले असता, त्यांना घराचे गेट आणि मुख्य दरवाजा उघडा दिसला. दरवाज्याचे तुटलेले कुलूप पाहून त्यांनी घरात धाव घेतली असता चोरीचा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच तिवसा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पंचनामा करून श्वान पथकाला पाचारण केले. चोरट्यांनी चोरी करण्यापूर्वी अत्यंत शिताफीने घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा डीव्हीआर बंद करून त्याचा पॉवर सप्लाय काढून ठेवला होता. तसेच, घराबाहेरील कॅमेऱ्यांचीही तोडफोड करून ते निष्क्रिय केले होते. यामुळे घटनेचे कोणतेही दृश्य पुरावे मिळू नयेत याची पूर्ण खबरदारी चोरट्यांनी घेतली होती, यावरून त्यांना घरातील रचना आणि पैशांच्या ठिकाणाची पूर्वकल्पना असावी असा संशय व्यक्त केला जात आहे. तिवसा पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा अधिक तपास वेगाने सुरू आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *