![]()
ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथे कार्यरत असलेले मृदू व जलसंधारण विभागाचे उपविभागीय अधिकारी लक्ष्मण मंडले यांचा कारच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. शनिवार आणि रविवारच्या सुट्टीनिमित्त घरी परतत असताना हा अपघात झाला आहे. सातारा जिल्ह्यातील कराड शहरात पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, धडक दिल्यानंतर कारचालक गाडीसह घटनास्थळावरून फरार झाल्याने हा निव्वळ अपघात आहे की घातपात, असा गंभीर संशय व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उपविभागीय अधिकारी लक्ष्मण मंडले हे सुट्टी घालवण्यासाठी घरी जात होते. पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास कराड शहरातील यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय हॉलच्या समोरून जात असताना, एका भरधाव चारचाकी कारने त्यांना जोरात धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, मंडले यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. चालक फरार; घातपाताची शंका अपघाताची भीषणता पाहूनही कारचालक मदतीसाठी थांबला नाही. तो थेट कारसह घटनास्थळावरून पसार झाला. चालक पळून गेल्यामुळे या घटनेमागे काही वेगळे कारण किंवा पूर्ववैमनस्य तर नाही ना, अशी शंका उपस्थित केली जात आहे. मंडले यांच्या कुटुंबीयांनी आणि नातेवाईकांनी या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. संशयितांची चौकशी सुरू घटनेची माहिती मिळताच कराड शहर पोलिसांनी तातडीने धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा केला. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू केले आहे. तसेच, पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. हा अपघात नेमका कसा झाला आणि त्यामागे घातपाताचा कोन आहे का, याचा तपास आता पोलिस करत आहेत.
Source link
सुट्टीनिमित्त घरी परतताना काळाचा घाला:कराडमध्ये ठाण्याच्या उपविभागीय अधिकाऱ्याला कारने चिरडले; जागीच मृत्यू, चालक फरार