नागपूर शहरात झाडांचे आरोग्य तपासण्यासाठी आणि संभाव्य अपघात टाळण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने (NMC) ‘लायडार’ (LiDAR) तंत्रज्ञान आणले आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने झाडांचे ‘डिजिटल हेल्थ कार्ड’ तयार केले जाणार आहे. बुधवारी दीक्षाभूमी परिसरात महापौर नीत
.
नागपूर महानगरपालिकेने ‘स्माईल कौन्सिल’ उपक्रमांतर्गत ‘ट्रीकोटेक एलएलपी’ आणि ‘थ्रीहील पीटीई’ यांच्या तांत्रिक सहकार्याने ही मोहीम हाती घेतली आहे. रस्त्यावरून धावणाऱ्या एका विशेष वाहनावर ‘लायडार’ स्कॅनर आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञान बसवण्यात आले आहे. हे वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या प्रत्येक झाडाचे अचूक डिजिटल मॅपिंग करेल.
या तंत्रज्ञानामुळे प्रत्येक झाडाचे स्वतंत्र ‘डिजिटल हेल्थ कार्ड’ तयार होईल. हे कार्ड झाडाची प्रजाती, अंदाजित वय, अंतर्गत पोकळी, खोडातील कुज आणि त्याच्या आरोग्याची सविस्तर माहिती देईल. यामुळे झाडांचे थ्री-डी मॉडेल तयार होऊन त्यांची संपूर्ण माहिती प्रशासनाकडे उपलब्ध होईल.

अनेकदा बांधकामे किंवा सिमेंटच्या जंगलामुळे झाडांची मुळे कमकुवत होतात, जे वरून दिसत नाही. हे ‘लायडार’ तंत्रज्ञान जमिनीतील आणि झाडाच्या संरचनेतील हे छुपे धोके पावसाळ्यापूर्वीच शोधून काढेल. यामुळे कोणत्या झाडाची छाटणी करायची, कोणावर उपचार करायचे किंवा कोणते झाड तातडीने सुरक्षित करायचे, याचे अचूक नियोजन पालिकेला करता येईल. यामुळे वादळ-वाऱ्यात झाडे उन्मळून पडल्याने होणारी जीवितहानी आणि वाहतुकीची कोंडी टाळता येईल.
‘लायडार’ हे एक अत्याधुनिक रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञान आहे, जे लेझर लाईटच्या मदतीने काम करते. वाहनावर बसवलेले लायडार यंत्र झाडांवर लेझर किरणांचा मारा करते. ही किरणे झाडाला किंवा जमिनीला धडकून परत यंत्राकडे आल्यावर, त्यांच्या प्रवासाच्या वेळेवरून झाडाचे अचूक अंतर, उंची आणि आकार मोजला जातो. एका सेकंदात लाखो लेझर किरणे सोडून हे तंत्रज्ञान झाडाचा हुबेहूब ‘थ्री-डी’ डिजिटल नकाशा तयार करते.