![]()
प्रवीण तरडे दिग्दर्शित देऊळ बंद 2 हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घालत आहे. 21 मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अवघ्या 20 दिवसांत तब्बल 62 कोटी रुपयांची नेट कमाई करत मराठी चित्रपटसृष्टीत नवा विक्रम केला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाने रितेश देशमुखच्या सुपरहिट ‘वेड’ चित्रपटाची कमाई मागे टाकत सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांच्या यादीत चौथे स्थान पटकावले आहे. स्नेहल तरडे, मोहन जोशी यांच्यासह दमदार कलाकारांची फौज असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. केवळ दहा कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने तिसऱ्या आठवड्यातही आपली घोडदौड कायम ठेवली आहे. प्रदर्शनाच्या 20 व्या दिवशी चित्रपटाने 1.10 कोटी रुपयांची कमाई केली असून एकूण ग्रॉस कलेक्शन 73.16 कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे. आता ‘बाईपण भारी देवा’चा विक्रम मोडण्याचे लक्ष्य..
आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार, ‘वेड’ चित्रपटाने 61.2 कोटी रुपयांची कमाई केली होती. मात्र ‘देऊळ बंद 2’ने हा टप्पा सहज पार करत चौथ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. आता चित्रपटासमोर ‘बाईपण भारी देवा’चा 76.28 कोटी रुपयांचा विक्रम मोडण्याचे लक्ष्य आहे. सध्याचा वेग पाहता हा टप्पाही लवकरच गाठला जाईल, असा विश्वास चित्रपटसृष्टीतील जाणकार व्यक्त करत आहेत.
मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत सध्या ‘राजा शिवाजी’ (105.64 कोटी), ‘सैराट’ (90 कोटी) आणि ‘बाईपण भारी देवा’ (76.28 कोटी) हे चित्रपट आघाडीवर आहेत. ‘देऊळ बंद 2’ची सुरू असलेली यशस्वी घोडदौड पाहता हा चित्रपट लवकरच आणखी मोठे विक्रम आपल्या नावावर करू शकतो. ‘देऊळ बंद 2’ चित्रपटाच्या कमाईतून शेतकरी कन्यांना दत्तक घेणार ‘देऊळ बंद २’ हा चित्रपट केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता, सामाजिक बांधिलकीचे एक आदर्श उदाहरण प्रस्थापित करत आहे. हा चित्रपट आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांतील मुलींना मदतीचा हात देणार आहे. ‘माणुसकीची चळवळ’ या संस्थेने या मोहिमेअंतर्गत ३०० शेतकरी कन्यांना दत्तक घेण्याचा संकल्प केला आहे. या चित्रपटातून मिळणाऱ्या नफ्याचा संपूर्ण वापर या मुलींच्या शिक्षण आणि विवाहासाठी केला जाईल. दत्तक घेतलेल्या प्रत्येक मुलीला तिच्या उच्च शिक्षणासाठी थेट १ लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. ‘माणुसकीची चळवळ’ संस्थेचे प्रमुख राज देशमुख यांनी ही घोषणा केली.
Source link
‘देऊळ बंद 2’चा बॉक्स ऑफिसवर धडाका:रितेश देशमुखच्या ‘वेड’ला मागे टाकले, सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांत चौथ्या स्थानी