Headlines

रहस्य आणि थराराचा संगम:सौभाग्यवती वृंदा मोहन मालिकेचा प्रोमो चर्चेत; मुख्य भूमिकेत दिसणार अभिनेत्री स्वाती भिंगारदिवे




‘सन मराठी’ वाहिनीवर लवकरच ‘सौभाग्यवती वृंदा मोहन’ या मालिकेतून रसिकांना रहस्य आणि थराराचा संगम पाहायला मिळणार आहे. या नव्या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. मालिकेचा विषय रहस्यमय आणि गूढतेने भरलेला असल्याचे दिसून येत आहे. मालिकेच्या पहिल्याच प्रोमोमध्ये एक तरुणी तिच्या नवऱ्याचा शोध घेताना पाहायला मिळते. नवऱ्याचा शोध घेत असताना बऱ्याच अडचणींचा सामना तिला करावा लागतो. या शोधामागे नेमके कोणते गूढ दडले आहे आणि वृंदाच्या आयुष्यात कोणती रहस्ये उलगडणार आहेत, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे. नवऱ्याचा शोध घेत असताना वृंदा स्वतःच एखाद्या नव्या सापळ्यात अडकेल का? हे पाहणं रंजक ठरेल. एकंदरीतच आयुष्यात येणारी अनपेक्षित वळणे, नात्यांमधील गुंतागुंत आणि भावनांनी भरलेला प्रवास या मालिकेत प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. येत्या 6 जुलै पासून सौभाग्य रक्षणाचा थरारक प्रवास सुरू होणार आहे. मालिकेत वृंदा या मुख्य भूमिकेत अभिनेत्री स्वाती भिंगारदिवे दिसून येत आहे. या भूमिकेविषयी बोलताना स्वाती म्हणाली की, ” ‘सौभाग्यवती वृंदा मोहन’ हे नाव आणि मालिकेची गोष्ट इतकी भन्नाट आहे की मी लगेचच मालिकेसाठी होकार दिला. वृंदा हे पात्र खूप भन्नाट आहे. स्वतःच्या नवऱ्याचा शोध घेण्यासाठी ती मुंबईत पोहोचते पण तिकडे नक्की तिच्यासोबत काय घडणार? हे खूप इंटरेस्टिंग असणार आहे. प्रोमो पाहून बऱ्याच जणांनी खूप कौतुक केलं पण सगळ्यांना उत्सुकता आहे मालिकेत नक्की काय घडणार? वृंदा म्हणजे जणू सावित्री आहे. मोहनसाठी ती काही ही करू शकते. अगदी स्वतःचा जीव धोक्यात घालायला देखील ती तयार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना मालिकेत ड्रामा, सस्पेन्स , थ्रिल हे सगळच पहायला मिळणार आहे. मी पहिल्यांदाच मुख्य भूमिका साकारत आहे त्यामुळे एक जबाबदारी,थोडं दडपण आहे.” यापुढे स्वाती म्हणाली, “मी अनेकदा मुख्य भूमिकांसाठी ऑडिशन दिल्या होत्या, पण काही ना काही कारणाने त्या भूमिका माझ्या वाट्याला येत नव्हत्या. कदाचित त्या भूमिकांसाठी मी बनले नव्हते. पण या मालिकेतील वृंदाचे पात्र वाचल्यानंतर ही भूमिका मलाच मिळावी, अशी मनापासून इच्छा होती. खरंतर वृंदाच पात्र वाचून मी फक्त मॅनिफेस्ट करत होते. आणि माझी निवड झाल्याचा फोन आला, तो क्षण माझ्यासाठी खूप खास होता. प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते आणि ती वेळ आली की आपल्यासाठी जे योग्य असते ते नक्की मिळते, यावर माझा पूर्ण विश्वास आहे. यापूर्वी मी ‘सन मराठी’सोबत काम केले आहे, मात्र मुख्य भूमिकेतून प्रथमच प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याचा मला खूप आनंद आहे.”



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *