Headlines

वेरूळ येथे शिक्षकाच्या संशयास्पद मृत्यूनंतर गावात तणाव:दुपारी 3 पासून रास्ता रोको, अंबादास दानवेंच्या हस्तक्षेपानंतर गुन्हा दाखल




छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळच्या कौशिकी गल्ली येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक सुरेश बोरसे यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर वेरूळ गावात बुधवारी तणावाचे वातावरण निर्माण झाले. दुपारी 3 वाजल्यापासून संतप्त गावकऱ्यांनी भोसले चौक ते घृष्णेश्वर मंदिर रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन सुरू केल्याने परिसरात वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. मृत सुरेश बोरसे यांच्या पत्नी अनिता बोरसे यांनी खुलताबाद पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. 10 जून 2026 रोजी रात्री 12 वाजता औषध आणण्यासाठी घराबाहेर गेलेल्या सुरेश बोरसे यांना काही अनोळखी व्यक्तींनी काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओतून जबरदस्तीने नेले. स्वतःला पोलिस असल्याचे सांगणाऱ्या त्या व्यक्तींनी कुटुंबीयांना सरकारी कामात अडथळा आणल्यास कारवाईची धमकी दिली. नंतर सुरेश बोरसे यांना गंभीर अवस्थेत छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दुपारी 3 पासून रास्ता रोको, वाहतूक विस्कळीत बुधवारी दुपारी तीन वाजता मृतदेह गावात येताच संतप्त नातेवाईक व गावकऱ्यांनी भोसले चौकात रास्ता रोको सुरू केला. शेकडो महिला-पुरुष रस्त्यावर ठाण मांडून बसल्याने भोसले चौक ते घृष्णेश्वर मंदिरापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. पोलिसांनी तात्काळ परिस्थितीचे गांभीर्य ओळखून भोसले चौकापासून कन्नड रस्त्याकडे वाहतूक वळवली. पर्यायी मार्गावरही प्रचंड गर्दी झाल्याने ‘विश्वकर्मा मंत्रिमंडळ’ परिसरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. ‘आम्हाला फक्त न्याय हवा’ : कुटुंबाची भूमिका बोरसे कुटुंबीयांनी “आम्हाला फक्त न्याय हवा, आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे” या मागणीवर ठाम राहत रास्ता रोको सुरूच ठेवला व मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. संध्याकाळी उशिरापर्यंत आंदोलन सुरू होते. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी दंगा निवारक पथक व अतिरिक्त कुमक वेरूळ येथे तैनात केली. गुन्हा दाखल, शोककळा पसरली उपविभागीय पोलिस अधिकारी, स्थानिक पोलिस व काही राजकीय नेत्यांनी गावकऱ्यांशी चर्चा करून समजूत काढली. रात्री उशिरापर्यंत गावकऱ्यांच्या एकमताने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. खुलताबाद पोलिसांनी भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 106(1) व 131 अन्वये गुन्हा दाखल केला असून निरीक्षक प्रशांत महाजन यांच्याकडे तपास सोपवण्यात आला आहे. शिक्षकाच्या मृत्यूमुळे संपूर्ण वेरूळ गावावर शोककळा पसरली आहे. गावातील अनेक व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून श्रद्धांजली वाहिली. घटनास्थळी मोठा पोलिस बंदोबस्त, रुग्णवाहिका व अग्निशमन दलाची गाडी सज्ज ठेवण्यात आली होती. पोलिस प्रशासनाने नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले असून, प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहे. तपासाला गती देण्यासाठी विशेष पथक स्थापन करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अंबादास दानवेच्या आक्रमक भूमिकेमुळे 22 तासानंतर गुन्हा दाखल शिक्षक सुरेश बोरसे यांच्या संशयास्पद मृत्यू झाला असून आरोपींवर तत्काळ गुन्हा दाखल करून अटक करण्याच्या मागणीसाठी वेरूळ येथे नागरिकांनी चक्का जाम केला होता. शिवसेना नेते तथा राज्याचे माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते, आमदार अंबादास दानवे यांनी या प्रकरणात आक्रमक भूमिका घेत चक्काजाम मध्ये सहभाग घेत न्यायासाठी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर अखेर खुलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. वेरूळ परिसरात एका आरोपीच्या शोधासाठी दोन पोलिस कर्मचारी आणि फिर्यादी घटनास्थळी गेले होते. संबंधित फिर्यादी हा वाळू माफियाशी संबंधित असल्याची माहिती समोर येत आहे. काळ्या रंगाच्या चारचाकी वाहनातून हे पथक आले होते. यावेळी रस्त्याने जाणारे शिक्षक सुरेश बोरसे यांनी “काय झाले?” अशी साधी विचारणा केली. मात्र याच कारणावरून त्यांना मारहाण झाल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे. याप्रकरणी पोलिस अधिकारी यांनी शिक्षकाला मारहाण करण्याचे आदेश दिल्याचा गंभीर आरोप होत असून त्यानंतर झालेल्या हल्ल्यात सुरेश बोरसे यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. शिक्षक सुरेश बोरसे यांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या प्रत्येक आरोपीवर कठोर कारवाई झालीच पाहिजे. कायद्याचे रक्षण करणारेच जर कायदा हातात घेत असतील, तर राज्यातील नागरिकांनी न्याय कोणाकडे मागायचा? या प्रकरणातील दोषींना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घालण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा अंबादास दानवे यांनी दिला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *