![]()
परतवाडा शहरातील गुरुकुल कॉलनीतील लहान मुलांनी स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाचा एक प्रेरणादायी संदेश दिला. ‘स्वच्छ भारत, हरित भारत’ या संकल्पनेतून त्यांनी स्वतःच्या हाताने जनजागृतीपर फलक तयार केले आणि परिसरात स्वच्छता व वृक्षारोपणाबाबत जागृती फेरी काढली. या फेरीदरम्यान, मुलांनी ‘स्वच्छता राखा’, ‘झाडे लावा’, ‘पर्यावरण वाचवा’ अशा विविध घोषणा देत नागरिकांना जागरूक केले. विशेष म्हणजे, हा उपक्रम कोणत्याही संस्थेच्या मदतीशिवाय मुलांनी पूर्णपणे स्वयंस्फूर्तीने आयोजित केला होता. अरविंद राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली या चिमुकल्यांनी संपूर्ण गुरुकुल कॉलनी परिसरातून फेरी काढली. त्यांनी नागरिकांना स्वच्छता राखण्याचे आवाहन केले आणि ‘संपूर्ण भारत स्वच्छ झाला पाहिजे आणि त्याची सुरुवात प्रत्येकाने स्वतःपासून केली पाहिजे’ असा संदेश दिला. या मिरवणुकीतून त्यांनी स्वच्छता अभियानासोबतच वृक्षारोपणालाही प्रोत्साहन दिले. या मुलांनी ‘लिटिल स्टार ग्रुप’ नावाने एक गट स्थापन केला आहे. या गटाद्वारे परिसरात नियमितपणे स्वच्छता, वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्याचा त्यांचा निर्धार आहे. त्यांच्या या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. या उपक्रमात अनुजा अमोल राऊत, ज्ञानेश्वरी पंकज महाजन, आयुषी प्रमोद वडसकर, ओजन निलेश वैद्य, निर्वा अमोल राऊत, रिया अमोल मासोदकर, श्लोक दीपक इंगळे आणि त्रिशा गणेश महाजन यांचा सहभाग होता.
Source link
परतवाड्यातील चिमुकल्यांनी दिला स्वच्छ भारत, वृक्षारोपणाचा संदेश:गुरुकुल कॉलनीत स्वयंस्फूर्तीने काढली जनजागृती फेरी