![]()
महाराष्ट्रातील ‘ऑपरेशन टायगर’वरून काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी भाजप आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. हे ऑपरेशन टायगर नसून ऑपरेशन गिधाड आहे, असे म्हणत त्यांनी सत्तेसाठी सुरू असलेल्या राजकीय हालचालींवर निशाणा साधला. लोकशाही व्यवस्थेत जनता पक्षाला मत देते, मात्र सत्ताधारी इतर पक्षांतील निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना आपल्या बाजूने वळवून सत्तेचा माज दाखवत असल्याचा आरोप त्यांनी केला. नाना पटोले म्हणाले, सत्तेची भूक असावी, पण मोदी आणि त्यांच्या आघाडीने ती मर्यादाही ओलांडली आहे. लोकशाही व्यवस्थेची हत्या करण्याचे काम सुरू आहे. तसेच लोकसभा अध्यक्षांच्या स्वायत्ततेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत, स्पीकरही मोदी-शहा सांगतील तेच करतात, असा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील काही खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर पटोलेंचे हे वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे. संजय राऊतांच्या 15 कोटींच्या ऑफर दाव्यालाही पाठिंबा संजय राऊत यांनी काही खासदारांना पक्ष सोडण्यासाठी मोठ्या आर्थिक ऑफर दिल्या जात असल्याचा दावा केला होता. त्याबाबत विचारले असता नाना पटोले म्हणाले की, “ते यापेक्षाही अधिक पैसे देऊ शकतात. कारण या लोकांनी देश लुटला आहे.” भाजपवर निशाणा साधताना त्यांनी म्हटले की, “लोकशाही व्यवस्थेची हत्या करण्याचे काम सुरू आहे. पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या आघाडीच्या या कृतीचा आम्ही तीव्र निषेध करतो.” लोकसभा अध्यक्षांवरही गंभीर आरोप दरम्यान, उद्धव ठाकरे गटाचे संसदीय पक्षनेते अरविंद यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून पक्षातील कोणत्याही फुटीर गटाला स्वतंत्र मान्यता देऊ नये, अशी मागणी केली आहे. तसेच निर्णय घेण्यापूर्वी ठाकरे गटाला आपली बाजू मांडण्याची संधी द्यावी, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. यावर प्रतिक्रिया देताना नाना पटोले यांनी लोकसभा अध्यक्षांच्या स्वायत्ततेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “लोकसभा अध्यक्षांकडून फार अपेक्षा ठेवता येत नाहीत. कारण ते पंतप्रधान मोदी आणि अमित शाह सांगतील त्यानुसारच निर्णय घेतात. संसदेमध्ये अध्यक्षपदाची स्वायत्ततादेखील कमी झाली आहे,” असा आरोप त्यांनी केला. ठाकरे गटाच्या संकटावरून राजकारण तापले उद्धव ठाकरे गटातील 9 पैकी 6 ते 7 खासदार वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने सर्व खासदारांना दिल्लीतील बैठकीसाठी व्हीप जारी केला आहे. तसेच लोकसभा अध्यक्षांकडे अधिकृत निवेदन देऊन पक्षाची संसदेतील एकमेव अधिकृत ओळख कायम ठेवण्याची मागणी केली आहे. याच घडामोडींवरून काँग्रेस, ठाकरे गट आणि महाविकास आघाडीतील इतर नेत्यांकडून भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका होत असून, आगामी काही दिवसांत या राजकीय संघर्षाला आणखी धार येण्याची चिन्हे दिसत आहेत.
ऑपरेशन टायगरशी भाजपचा संबंध नाही- चंद्रशेखर बावनकुळे राज्यात सुरू असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांवर भाजप प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया देत भाजपचा या घडामोडींशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राला मजबूत सरकार मिळाले असून देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे मुख्यमंत्री आहेत, असे त्यांनी ठामपणे सांगितले. तसेच संजय राऊत यांनी खासदारांना 15 कोटींचा ॲडव्हान्स दिल्याचा केलेला दावा अत्यंत चुकीचा आणि बिनबुडाचा असल्याचे त्यांनी म्हटले. उद्धवसेनेत पुन्हा फूट?: 6 खासदारांच्या ‘दिल्ली मिशन’मुळे महाराष्ट्रात खळबळ; शिंदेही राजधानीत, बावनकुळे म्हणाले- भाजपचा याच्याशी काहीही संबंध नाही महाराष्ट्राच्या राजकारणात 2022 मधील शिवसेना फुटीनंतर पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाची चिन्हे दिसू लागली आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील तब्बल सहा खासदारांनी दिल्लीत तळ ठोकल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. हे खासदार स्वतंत्र संसदीय गट स्थापन करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत असून, त्यासाठी आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वाचा बातमीचे लाइव्ह अपडेट्स
Source link
ऑपरेशन टायगर नव्हे, ऑपरेशन गिधाड:नाना पटोलेंचा भाजपवर हल्लाबोल, लोकशाहीची हत्या होत असल्याचा आरोप