Headlines

11 वर्षांपासून फरार नक्षल समर्थक आरोपीला अटक:बापू जनगम गडचिरोली पोलिसांनी ठोकल्या बेड्या, नडीकुडा गावातून घेतले ताब्यात




गडचिरोली पोलिसांनी ११ वर्षांपासून फरार असलेल्या एका नक्षल समर्थक आरोपीला अटक करण्यात यश मिळवले आहे. बापू व्यंकटी जनगम (रा. नडीकुडा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो पोलिसांच्या अभिलेखावरील ग्राम रक्षक दल (जी.आर.डी.) या यादीत समाविष्ट असून, नक्षलवाद्यांना मदत करणाऱ्या ‘जनमिलिशिया’ संघटनेशी संबंधित होता. जनगम हा दीर्घकाळापासून पोलिसांना गुंगारा देत होता. त्याचा शोध घेण्यासाठी गडचिरोली पोलिसांकडून सातत्याने विशेष मोहिमा राबवल्या जात होत्या. १७ जून २०२६ रोजी असरअल्ली पोलीस स्टेशनच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, फरार आरोपी बापू जनगम आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी नडीकुडा गावात आला आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ नियोजनबद्ध कारवाई करत नडीकुडा गावाला वेढा घातला. शोधमोहिमेदरम्यान, जनगम गावातील शेतशिवार परिसरात लपलेला आढळला. पोलिसांनी त्याला शिताफीने वेढा घालून ताब्यात घेतले आणि अटक केली. अटक करण्यात आलेला आरोपी बापू जनगम हा खून, खुनाचा प्रयत्न आणि शासकीय सेवकावर हल्ला यांसारख्या अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये पोलिसांना पाहिजे होता. त्याच्याविरुद्ध असरअल्ली पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये एकूण पाच गंभीर गुन्हे दाखल आहेत. यामध्ये २०१५ मधील खुनाच्या एका गुन्ह्याचाही समावेश आहे. या खुनाच्या गुन्ह्यातील त्याच्या सह-आरोपीला गडचिरोली सत्र न्यायालयाने यापूर्वीच जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे. पोलिसांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषणाने, गुप्त माहितीने आणि स्थानिक पातळीवरील पाळत ठेवून केलेल्या कामगिरीमुळे या आरोपीला गजाआड करण्यात यश आले. या कारवाईमुळे पोलिसांच्या रेकॉर्डवरील एका महत्त्वाच्या आरोपीचा शोध पूर्ण झाला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *