Headlines

खराडीत कौटुंबिक वादातून पत्नीचा खून:पतीने धारदार शस्त्राने वार करत जीव घेतला, आरोपी फरार




पुणे शहरातील खराडी भागात कौटुंबिक वादातून एका महिलेचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी पहाटे घडली. या प्रकरणी पती दयाराम तोताराम बाबर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, तो फरार आहे. पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी तपास पथक रवाना केले आहे. किरण दयाराम बाबर (वय ३२, रा. भनगाई वस्ती, खराडी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. किरणचा भाऊ दादू सजन बोरसे (वय २३) यांनी खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी पती दयाराम बाबर (वय ३६) हा खासगी ठिकाणी सफाई कामगार म्हणून काम करतो, तर किरण घरकामे करत होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दयारामला दारू पिण्याचे व्यसन होते. गेल्या काही दिवसांपासून बाबर दाम्पत्यामध्ये कौटुंबिक वाद सुरू होते. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. बुधवारी पहाटे चारच्या सुमारास किरण गाढ झोपेत असताना, शेजारी मुले झोपलेली होती. याच वेळी आरोपी पतीने तिच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केले. त्याने किरणचे नाक आणि कानही कापले. यामुळे मोठा रक्तस्त्रावर होऊन ती बेशुद्ध झाली. गंभीर जखमी झालेल्या किरणला तिचा भाऊ दादू याने तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. आरोपी पती सध्या फरार असून, पोलीस त्याचा कसून सर्वत्र शोध घेत आहेत. खून करण्यासाठी वापरलेले शस्त्र अद्याप मिळालेले नाही. सहायक पोलीस निरीक्षक सचिन जाधव या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *