Headlines

विवाह मोडल्याने तरुणीचा खून:आरोपीला जन्मठेप, पुणे सत्र न्यायालयाचा निकाल; २० हजार रुपये दंडही ठोठावला




विवाह मोडल्याच्या कारणावरून एका तरुणीवर चाकूने वार करून तिचा खून करणाऱ्या आरोपीला पुणे अतिरिक्त सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश हर्षल भालेराव यांनी हा निकाल दिला. शरीफ रज्जाक शेख (वय २७, रा. अश्रफनगर, कोंढवा बुद्रुक) असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. २०१८ मध्ये शेख याचा नाझनीन सादिक शेख (वय १८, रा. गणेश पेठ) हिच्याशी विवाह निश्चित झाला होता. मात्र, काही कारणांमुळे हा विवाह मोडला, ज्यामुळे शेख तरुणीवर चिडला होता. २३ जुलै २०१९ रोजी आरोपी शेख गणेश पेठेतील तरुणीच्या राहत्या घरात शिरला. त्याने नाझनीनवर चाकूने अनेक वार केले. त्यावेळी तिची आई फैमिदा (वय ४५) यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, शेखने त्यांच्यावरही चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात फैमिदा जखमी झाल्या. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. नाझनीन आणि तिच्या आईला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान नाझनीनचा मृत्यू झाला. या प्रकरणी फैमिदा यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी आरोपी शेखला अटक करून त्याच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. या खटल्यात सरकार पक्षाकडून अतिरिक्त सरकारी वकील संजय पवार यांनी नऊ साक्षीदारांची साक्ष नोंदवली. नाझनीनची आई फैमिदा आणि शेजाऱ्यांची साक्ष या खटल्यात महत्त्वाची ठरली. सरकारी वकील पवार यांनी युक्तिवादात, “आरोपीने केलेला गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून, त्याला कठोर शिक्षा सुनावण्यात यावी,” अशी विनंती न्यायालयाला केली. न्यायालयाने सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी शरीफ रज्जाक शेखला जन्मठेप आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. बचाव पक्षाच्या वकिलांनी, “घटनास्थळावरून जप्त केलेल्या चाकूवर आरोपीच्या बोटांचे ठसे आढळले नाहीत, त्यामुळे आरोपीने तरुणी आणि तिच्या आईवर हल्ला केला, असे म्हणणे योग्य ठरणार नाही,” असा युक्तिवाद केला होता. मात्र, न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळून लावला. चाकू रक्ताने माखला असल्याने बोटांचे ठसे पुसले जाण्याची दाट शक्यता असते, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *