![]()
लग्नावेळी तब्बल 31 लाख रुपये हुंडा व चारचाकी वाहन देऊनही पैशांच्या मागण्या न थांबल्याने, सततच्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून 26 वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना 23 जून रोजी मेहकर येथे उघडकीस आली. या प्रकरणी मृत विवाहितेच्या वडिलांच्या तक्रारीवरून कृषी सहाय्यक पदावर कार्यरत असलेल्या पतीसह सासू, सासरे व नणंद यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करणे, हुंडाबळी प्रतिबंधक कायदा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बारई (ता. मेहकर) येथील निवृत्त शिक्षक व शेतकरी रतन श्रीकिसन पागोरे त्यांची मुलगी वैष्णवी हिचा विवाह 22 एप्रिल 2022 रोजी गणेश रामेश्वर मेरत यांच्याशी झाला होता. विवाहावेळी वर पक्षाकडून करण्यात आलेल्या मागणीनुसार त्यांनी 31 लाख रुपये हुंडा व चारचाकी वाहनही घेऊन देण्यात आले. मात्र लग्नाच्या काही महिन्यानंतर वधूवर आणखी पैशांसाठी वारंवार दबाव टाकला जात होता. वाहनाच्या कर्जाचे उर्वरित हप्ते भरण्याच्या कारणावरून वैष्णवीला मारहाण करण्यात आली. पती गणेश मेरत हा शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात व्यवहार करत असून त्यात लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने माहेरहून पैसे आणण्याचा तगादा लावत होता. यासाठी वैष्णवी वर सातत्याने मानसिक आणि शारीरिक अत्याचार करण्यात येत होते.कुटुंबीयांनी अनेक वेळा समेट बैठका घेऊन प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक वेळी यापुढे त्रास देणार नसल्याचे आश्वासन सासरच्या मंडळींकडून देण्यात आले. मात्र काही दिवसांनी पुन्हा पैशांसाठी छळ सुरू होत असल्याचे वैष्णवीने आपल्या आई-वडिलांना सांगितले होते. तक्रारीत नमूद करण्यात आले आहे की, काही दिवसांपूर्वी पती व सासरच्या मंडळींनी वैष्णवीकडे 10 लाख रुपये माहेरहून आणण्याची मागणी केली होती. पैसे न आणल्यास “फाशी घेऊन मर” असा दबाव देखील आणण्यात आला होता. 23 जून रोजी सकाळी वैष्णवीने आपल्या वडिलांना फोन करून मागील रात्री झालेल्या मारहाणीची माहिती दिली. तसेच सासरच्या मंडळींचा त्रास असह्य झाल्याने आत्महत्या करण्याचा इशाराही तिने दिला होता. वडिलांनी तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र काही वेळातच नातेवाइकांकडून वैष्णवीने गळफास घेतल्याची माहिती मिळाली. घराचा दरवाजा उघडल्यानंतर तिचा तीन वर्षीय मुलगा आयांश घरात आढळला. तीन वर्षांच्या चिमुकल्या समोर स्वयंपाकघरात आत्महत्या घटनेवेळी वैष्णवीचा तीन वर्षीय मुलगा आयांश घरातच उपस्थित होता. दरवाजा उघडून त्याने नातेवाइकांना आत प्रवेश दिल्यानंतर स्वयंपाकघरात वैष्णवीचा मृतदेहआढळून आला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Source link
हुंड्यासाठी छळ; पत्नीने घेतला तीन वर्षांच्या बाळासमोर गळफास:कृषी सहाय्यक पतीसह चौघांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल, मेहकरमधील घटना