Headlines

कन्नडला 3 हजार नागरिकांमागे 1 पोलिस:37 कर्मचाऱ्यांवर भार, शहरामध्ये सुरक्षेचा उडाला बोजवारा‎




कन्नड शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारीने उच्चांक गाठला असून, नुकतीच पोलिस ठाण्याच्या मुख्य प्रवेशद्वारात झालेल्या एका खुनाच्या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे पोलिसांच्या अंतर्गत सुरक्षेचा आणि अपुऱ्या मनुष्यबळाचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. सद्यस्थितीत ठाण्यातील रिक्त पदांची संख्या पाहता, ३ हजार नागरिकांमागे १ पोलिस असून, ५२ पदे रिक्त असल्याने ३७ कर्मचाऱ्यांवर भार पडत आहे. कन्नड शहराची लोकसंख्या ५५ हजारांच्या पार गेली असून, या पोलिस ठाण्यांतर्गत शहरासह ग्रामीण भागातील २४ गावांच्या सुरक्षेची अतिरिक्त जबाबदारी आहे. यामध्ये बहिरगाव, दाभाडी, मालपूर, डोणगाव, रिठी, मोहरडा, विठ्ठलपूर, गराडा, ब्राह्मणी, हिवरखेडा, गौताळा, कोळसवाडी, नरसिंगपूर, गारगोटी, अंधानेर, मुंडवाडी, सातकुंड, तेलवाडी, मक्रणपूर, रेल, रेल तांडा, कणकवतीनगर, कारखाना, बनशेंद्रा आणि पळसगाव या गावांचा समावेश होतो. शहर व ग्रामीण भाग मिळून सुमारे एक लाखापेक्षा अधिक जनतेची सुरक्षा रामभरोसे आहे. काही कर्मचाऱ्यांना न्यायालयीन कामकाज, तातडीचे बंदोबस्त, उरूस, जत्रा आणि सण-उत्सवांची जबाबदारी सांभाळावी लागते. परिणामी, शहरातील पिशोर नाका व हिवरखेडा नाका भागात सुरक्षा नसून, येथील सुरक्षा सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या भरवशावर आहे. Q. शहर ठाण्यातील ५२ रिक्त पदे कधी भरणार? A. वरिष्ठ स्तरावरून शासनाकडे प्रस्ताव सादर आहे. मंजुरी मिळताच ही पदे भरली जातील. Q. गस्तीचे वाहन कधी बदलणार, चालक कधी मिळणार? उत्तर: वाहन चालकाची बदली झाली आहे. दुसरा चालक रुजू होत नाही, तोपर्यंत सध्याच्या चालकाला कार्यमुक्त केले जाणार नाही. Q. पोलिस ठाण्याच्या प्रवेशद्वारातच खून झाला? A. या प्रकरणातील मुख्य आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस ठाण्याकडे रात्रीच्या गस्तीसाठी केवळ एकच जीप उपलब्ध आहे. ही जीप जुनी असून, ती सुरू होण्यासाठीच मोठा वेळ लागतो. विशेष म्हणजे, वाहन चालकाचे पदही रिक्त असल्याने गाडी चालवायची कोणी, असा प्रश्न आहे. जून महिन्यात एकाच रात्री ६ घरफोड्या झाल्या. गेल्या दोन वर्षांत या ठाण्याअंतर्गत ५ खून झाले आहेत, ज्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. कन्नड शहर ठाण्यात प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षकांसह दोन सहायक पोलिस निरीक्षक पदे मंजूर आहेत. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून सहायक पोलिस निरीक्षकाचे एक पद रिक्त आहे. तसेच, स्वीकृत ८९ पोलिस कर्मचाऱ्यांच्या पदांपैकी ५२ पदे रिक्त असून ३७ कर्मचाऱ्यांवर या संपूर्ण परिसराचा भार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *