![]()
भडगाव तालुक्यातील महिंदळे येथून पंढरपूर वारीसाठी निघालेल्या पदयात्रा दिंडीतील भाविकांना चाळीसगाव तालुक्यातील बेलदारवाडी येथे सोडून परतणाऱ्या ग्रामस्थांच्या ट्रॅक्टरला कजगावजवळ गॅस टँकरने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात एका भाविकाचा जागीच मृत्यू झाला असून दोन महिलांसह १५ जण जखमी झाले आहेत. अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले असून जखमींवर चाळीसगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की ट्रॅक्टरचे अक्षरशः दोन तुकडे झाले. महिंदळे गावातून दरवर्षीप्रमाणे यंदाही पदयात्रा दिंडी निघाली होती. भाविकांना बेलदारवाडी येथे सोडून ग्रामस्थ ट्रॅक्टरने मध्यरात्री ११ ते १२ वाजेच्या सुमारास महिंदळेकडे परतत होते. कजगावजवळ रस्ता क्रॉस करत असताना मलकापूर येथील रत्ना गॅस एजन्सीच्या एमएच-२८ एबी-८२२५ क्रमांकाच्या भरधाव गॅस मालवाहतूक टँकरने ट्रॅक्टरला मागून जोरदार धडक दिली. टँकर चालक गोविंद सुभाष जाधव (रा. बोलठाण, ता. नांदगाव, जि. नाशिक) हा गाडी चालवत होता. या अपघातात दिनकर शेनपडू पाटील (भदाणे) यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे. भडगाव पोलिस ठाण्यात या प्रकरणी अपघाताचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे. { सतिलाल नरसिंग पाटील (वय ४५) { शशिकांतबाई जगदीश पाटील (वय २६) { जगदीश निंबा पाटील (वय ३५) { नंदू ताकतसिंग पाटील (वय ४०) { पंकज जुलाल पाटील (वय ३५) { जोहरलाल नंदा पाटील (वय ६०) { भगवान निंबा पाटील (वय ४४) { दिलीप उदयसिंग पाटील (वय ७०) { रावसाहेब बाळू पाटील (वय ४५) { अमोल सुरेश पाटील (वय ३०) { अविनाश लुभान पाटील (वय ४२) { नथाबाई रमेश मिस्तरी (वय ५५) { बाबूलाल महादू बच्छाव (वय ६०) { महेश बाळकृष्ण कुलकर्णी (वय ३५)
Source link
कजगावजवळ टँकरची धडक; एकाचा मृत्यू, पंधरा जण जखमी:ट्रॅक्टरचे झाले दोन तुकडे, महिंदळे गावावर शोककळा