Headlines

सीमावर्ती परिसरात कारहुणवीचा उत्सव, अलंकारांनी सजवून बैलांच्या मिरवणुका:सलगरमध्ये बैल पळविण्याचा मोठा थरार; कर तोडण्याची प्रथा‎




वटपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोट शहरासह तालुक्यात सोमवारी पारंपरिक कारहुणवी सण मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला. त्याच्या दुसऱ्या दिवशी सलगर येथे बैल पळविण्याचा थरार अनुभवण्यासाठी कर्नाटक व महाराष्ट्रातील हजारो नागरिकांनी उपस्थिती लावली. सोमवारी पहाटेपासूनच शेतकऱ्यांनी आपल्या बैलांची आकर्षक सजावट करून विधिवत पूजा, नैवेद्य, आरती, मिरवणुका आणि सायंकाळी पारंपरिक कर तोडण्याचा कार्यक्रम पार पडला. दिवसभर तालुक्यात उत्सवी वातावरण अनुभवायला मिळाले. कर्नाटक सीमेलगत असलेल्या अक्कलकोट तालुक्यात हा सण विशेष उत्साहात साजरा करण्याची अनेक वर्षाची परंपरा आहे. यंदाही शिरवळ, वागदरी, जेऊर, करजगी, नागणसुर, तोळणूर, दुधनी, मैदर्गी, बोरोटी, बबलाद, हैद्रा, तडवळ, मंगरूळ, गोगाव, खैराट, भुरीकवठे, चिक्केहळ्ळी, हत्तीकणबस आदी गावांमध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. कारहुणवीच्या दिवशी पहाटे शेतकरी आपल्या बैलांना स्नान घालून त्यांच्या शिंगांना लाल रंग लावतात, तर शरीराला पिवळा रंग देतात. झालरी, घुंगरू आणि विविध अलंकारांनी बैलांची आकर्षक सजावट केली जाते. त्यानंतर गावातून मिरवणूक काढून प्रत्येक घरासमोर बैलांची विधिवत पूजा,नैवेद्य आणि आरती केली जाते. सायंकाळी वाजत-गाजत मिरवणूक काढून हनुमान मंदिराला फेऱ्या मारल्यानंतर गावाच्या वेशीवर मानकऱ्यांच्या हस्ते पारंपरिक ‘कर तोडणे’ विधी पार पाडला जातो. तसेच सलगर येथील जयहनुमान यात्रेनिमित्त मंगळवार, ३० जून रोजी पहाटे ३ ते ५ या वेळेत दंडवत कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात भाविकांनी मोठ्या श्रद्धा व भक्तिभावाने सहभाग घेतला. पहाटेच्या शांत व पवित्र वातावरणात जय हनुमानाच्या नामघोषाने परिसर भक्तिमय झाला. उपस्थित सर्वांनी श्री हनुमानाच्या चरणी प्रार्थना करून सुख, समृद्धी व सर्वांच्या कल्याणाची कामना केली. कार्यक्रमानंतर भाविकांनी एकमेकांना शुभेच्छा देत धार्मिक उत्साहाने यात्रेचा आनंद लुटला. जेऊर येथे बैलाकडून कर तोडण्याचा विधी, दिवसभर ग्रामस्थांसाठी महाप्रसादाची सोय जेऊर येथे महांतेश पाटील, मल्लिकार्जुन पाटील आणि काशीराया पाटील यांनी परंपरेनुसार दिवसभर ग्रामस्थांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले. त्यानंतर सायंकाळी त्यांच्या बेलाकडून कर तोडण्याचा विधी पार पडला. त्यानंतर गावातून बैलांची मिरवणूक काढण्यात आली. शेतकऱ्यांसाठी वर्षातील बैलांचा हा महत्त्वाचा सण मानला जातो. काही गावांमध्ये सजवलेल्या बैलांच्या मिरवणुका काढण्यात आल्या, तर काही ठिकाणी विधी करण्यात आले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *