Headlines

गोदावरी पात्रात वाळू तस्करांवर छापा; 12.20 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त:विनाक्रमांकाचा डंपर जप्त, निफाडचा चालक पोलिसांच्या ताब्यात‎




तालुक्यातील सांगवीभुसार शिवारातील गोदावरी नदीच्या पात्रातून डंपरच्या साहाय्याने अवैधरित्या वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्या तस्करांवर कोपरगाव तालुका पोलिसांनी धडक छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी १२ लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असून एकाला ताब्यात घेतले आहे. तालुका पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना सांगवीभुसार शिवारामध्ये गोदावरी पात्रातून अवैध वाळू उपसा सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिस पथकाने नदीपात्रात जाऊन खात्री केली असता, काही इसम डंपरमध्ये वाळू भरताना रंगेहात आढळून आले. पोलिसांचा छापा पडताच वाळू भरणारे इतर इसम अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. पोलिसांनी घटनास्थळावरून डंपर चालक आकाश दत्तू पिंपळे (वय १९, रा. खेडले झुंगे, ता. निफाड, जि. नाशिक) याला ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून १२ लाख रुपये किमतीचा एक विनाक्रमांकाचा पिवळ्या रंगाचा डंपर आणि त्यातील २० हजार रुपये किमतीची २ ब्रास शासकीय वाळू असा एकूण १२ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपीविरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गु.र.नं. २७६/२०२६ नुसार बीएनएस ३०३(२), ३(५) सह पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम ३/१५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *