Headlines

लाखनवाड्यात डोंगरावर गारगोट्यांची रहस्यमय ‘चादर’:50 मीटर परिसरात लाखो गारगोट्या; अभ्यासकांकडून भूगर्भ शास्त्रीय संशोधनाची परिसरातील नागरिकांची मागणी




तालुक्यातील लाखनवाडा येथे डोंगर पठारावरील एका विशिष्ट सपाट परिसरात गार गोट्यांचा प्रचंड साठा आढळून आला असून, या नैसर्गिक वैशिष्ट्याने नागरिकांसह अभ्यासकांचेही लक्ष वेधले आहे. सुमारे ५० मीटर व्यासाच्या या भागात विविध रंगांच्या लाखो गारगोट्यांनी जमिनीवर जणू काही चादर अंथरल्याचे चित्र दिसून येते. विशेष म्हणजे या परिसराच्या आजूबाजूला किंवा जमिनीच्या आत अशा प्रकारच्या गार गोट्या आढळत नसल्याने हा प्रकार नेमका कसा निर्माण झाला, याबाबत मोठे कुतूहल व्यक्त होत आहे. लाखनवाडा परिसरातील डोंगररांग मुख्यतः काळ्या पाषाणांनी व्यापलेली आहे. मात्र त्याच डोंगरावरील एका मर्यादित पट्ट्यात विविध आकार व रंगांच्या गार गोट्यांचा मोठा खच दिसून येतो. स्थानिकांच्या माहितीनुसार हा परिसर अनेक शतकांपासून याच स्वरूपात आहे. पावसाळ्यात हिरवाईने नटलेल्या डोंगराच्या पार्श्वभूमीवर पांढऱ्या व रंगीबेरंगी गार गोट्यांचा हा पट्टा अधिकच आकर्षक दिसत असल्याने अनेक जण तो पाहण्यासाठी येथे येतात. स्थानिकांच्या मते, प्राचीन काळात अग्नी प्रज्वलित करण्यासाठी ‘चकमक’ म्हणून अशाच प्रकारच्या गार गोट्यांचा वापर केला जात असे. त्यामुळे या गार गोट्यांचा इतिहास आणि भूगर्भीय उगम जाणून घेण्यासाठी तज्ज्ञांनी वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. या परिसराचे भूगर्भ शास्त्रीय सर्वेक्षण करून आवश्यक असल्यास उत्खननाद्वारे संशोधन करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात गार गोट्या या ठिकाणी कशा जमा झाल्या, त्यामागे कोणती भूगर्भीय प्रक्रिया होती, याचा उलगडा झाल्यास या भागाच्या नैसर्गिक इतिहासावरही प्रकाश पडू शकतो, असे मत जाणकार व्यक्त करत आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन शासनाकडे या ठिकाणाच्या वैज्ञानिक संशोधनासाठी पाठपुरावा करावा, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. कुतूहल वाढवणारा ५० मीटरचा गारगोट्यांचा पट्टा लाखनवाड्यातील गार गोट्यांचा हा परिसर सुमारे ५० मीटर व्यासाचा आहे. आजूबाजूला काळ्या पाषाणांचे डोंगर असताना केवळ याच भागात विविध रंगांच्या गार गोट्यांचा मोठा साठा आढळतो. अनेक पिढ्यांपासून हा नजारा कायम असल्याचे स्थानिक सांगतात. त्यामुळे हा केवळ नैसर्गिक योगायोग नसून भूगर्भ शास्त्रीय दृष्टीने महत्त्वाचा ठेवा असू शकतो, अशी चर्चा होत आहे. तज्ज्ञांकडून सखोल संशोधन झाल्यास या रहस्याचा उलगडा होऊन हा परिसर भविष्यात भू-पर्यटनाच्या दृष्टीनेही महत्त्वाचे आकर्षण ठरू शकतो.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *