![]()
मानपाडा परिसरातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे विभागप्रमुख प्रदीप ऊर्फ बाळू पूर्णेकर यांच्या निर्घृण हत्या प्रकरणात ठाणे गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले आहे. या हत्येतील आणखी दोन मुख्य आरोपिंना पोलिसांनी मुंबई-गोवा महामार्गावरील अलिबागजवळ एका डेअरीतून बेड्या ठोकल्या आहेत. निखिल यादव आणि नितेश पवार अशी या अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींची नावे आहे. या प्रकरणातील अटक आरोपींची संख्या आता तीनवर पोहोचली आहे. पोलिसांनी कसा काढला माग? मंगळवारी रात्री प्रदीप पूर्णेकर यांच्या कार्यालयात घुसून पाच जणांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि कोयत्याने वार केले होते. या घटनेनंतर आरोपी पसार झाले होते. ठाणे गुन्हे शाखेचे डीसीपी अमरसिंह जाधव यांच्या नेतृत्वाखाली आरोपींच्या शोधासाठी ९ विशेष पथके तैनात करण्यात आली होती. पोलिसांनी यापूर्वी ‘पप्या शिंदे’ या एका आरोपीला ताब्यात घेतले होते. पप्या शिंदे याच्या संपर्कात असलेल्या मीरा-भाईंदरमधील काही महिला आणि पुरुषांना पोलिसांनी काल ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली. या चौकशीतून पोलिसांना फरार आरोपींच्या संभाव्य लपण्याच्या ठिकाणांची अत्यंत महत्त्वाची माहिती मिळाली. याच माहितीच्या आधारे पोलिसांनी अलिबागजवळच्या एका डेअरीवर अचानक छापा टाकून तिथे लपून बसलेल्या निखिल आणि नितेशला जेरबंद केले. वडापाव विक्रेत्यानेच झाडल्या गोळ्या पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. अटक करण्यात आलेला आरोपी निखिल यादव हा पूर्णेकर यांच्या कार्यालयाशेजारीच असलेल्या एका वडापावच्या गाडीवर काम करायचा. पूर्णेकरांवर प्रत्यक्ष गोळ्या झाडण्याचे काम याच निखिलने केले होते. तर, दुसरा आरोपी नितेश पवार ऊर्फ भावड्या याने पूर्णेकर यांच्यावर कोयत्याने सपासप वार केले होते. नितेश हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. दोन आरोपी अद्याप फरार प्रत्यक्ष हत्या करणाऱ्या पाच मुख्य आरोपींपैकी पप्या शिंदे, निखिल यादव आणि नितेश पवार हे तिघे आता पोलिसांच्या ताब्यात आहेत. मात्र, संतोष कनोजिया ऊर्फ टल्ली आणि हेल्मेट घालून आलेला आणखी एक अज्ञात मारेकरी अद्याप फरार आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या चौकशीतून उर्वरित दोन मारेकऱ्यांचा शोध लागण्याची शक्यता आहे. माजी महापौर मीनाक्षी शिंदेंनी आरोप फेटाळले, पत्रकार परिषदेकडे लक्ष दरम्यान, पूर्णेकर कुटुंबीयांनी या हत्येमागे शिंदे गटाच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांचा हात असल्याचा गंभीर आरोप केला होता. या वाढत्या दबावाच्या पार्श्वभूमीवर, आज स्वतः मीनाक्षी शिंदे एक पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू स्पष्ट करणार आहेत. त्यामुळे या पत्रकार परिषदेत त्या नेमके काय बोलणार, याकडे आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचे आणि पोलिसांचे लक्ष लागून राहिले आहे. हेही वाचा.. प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरण: ठाकरे गटाच्या आक्रमक पवित्र्यानंतर संशयितांची नावे जबाबात; हजारो समर्थकांच्या उपस्थितीत अखेरचा निरोप
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे ठाण्यातील विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या निर्घृण हत्येचे तीव्र पडसाद बुधवारी शहरात उमटले. जे. जे. रुग्णालयातून पूर्णेकर यांचे पार्थिव कापूरबावडी पोलिस ठाण्यात आणल्यानंतर कुटुंबीय आणि हजारो समर्थकांनी तिथेच आक्रोश करत आंदोलन सुरू केले. या कठीण प्रसंगात प्रदीप पूर्णेकर यांचा मुलगा राम याने इन्स्टाग्रामवर वडिलांसोबतचा एक फोटो पोस्ट करून केवळ ‘पप्पा’ असे कॅप्शन देत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. सायंकाळी हजारो समर्थकांच्या उपस्थितीत पूर्णेकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सविस्तर वाचा
Source link
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरण:अलिबागमधून आणखी 2 आरोपींना बेड्या; माजी महापौर मीनाक्षी शिंदेंनी आरोप फेटाळले, पत्रकार परिषदेकडे लक्ष