![]()
पुण्यातील ‘गिरिप्रेमी’ गिर्यारोहण संस्थेच्या ११ महिला गिर्यारोहकांचा एक संघ लडाखमधील मेंटोक कांग्री (६,२५० मीटर) या हिमशिखराच्या मोहिमेसाठी रवाना झाला आहे. ही १६ दिवसांची मोहीम ३ जुलैपासून सुरू होणार असून, यात १८ ते ६० वयोगटातील महिलांचा समावेश आहे. ज्येष्ठ गिर्यारोहक अंजली कात्रे (६०) यांचा सहभाग या मोहिमेचे विशेष आकर्षण ठरत आहे. या मोहिमेला बुधवारी प्रसिद्ध उद्योजिका व ग्रॅव्हिटस फाउंडेशनच्या संस्थापिका उषा काकडे यांच्या हस्ते भारताचा राष्ट्रध्वज देऊन शुभारंभ करण्यात आला. यावेळी ‘गिरिप्रेमी’ संस्थेच्या संस्थापिका उषाप्रभा पागे, प्रसिद्ध गिर्यारोहक उमेश झिरपे आणि संस्थेचे सचिव मनोज कुलकर्णी उपस्थित होते. उषा काकडे यांनी महिला गिर्यारोहकांच्या धैर्याचे कौतुक केले. त्या म्हणाल्या, “अत्यंत कठीण परिस्थितीत सलग १६ दिवस चालण्याची तयारी आणि कोणतीही भीती न बाळगता हिमालयातील आव्हान स्वीकारण्याचा आत्मविश्वास या महिलांमध्ये दिसून येतो. त्यांच्या धैर्याला आणि चिकाटीला मी सलाम करते.” या मोहिमेचे नेतृत्व तन्वी चव्हाण (३८) करत आहेत. त्यांना उषाप्रभा पागे, उमेश झिरपे, अविनाश फौजदार आणि आशिष माने यांचे मार्गदर्शन लाभले आहे. संघात सोनिया भावसार (२६), देवयानी वडनेरकर (४५), अंजली कात्रे (६०), शीतल मुकादम (४७), अनुष्का देव (२५), गायत्री दमामे (२१), चेतना शेटे (२९), साक्षी प्रभुणे (२२), शर्वरी परांजपे (२४) आणि तनिष्का शिंदे (१८) या महिला गिर्यारोहकांचा समावेश आहे. उमेश झिरपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या मोहिमेसाठी सहभागी महिलांनी गेल्या अनेक महिन्यांपासून कठोर शारीरिक आणि मानसिक तयारी केली आहे. यामध्ये सह्याद्रीतील ट्रेक, दीर्घ पल्ल्याच्या पदभ्रमंती, तंदुरुस्तीचे प्रशिक्षण आणि हिमालयीन मोहिमेची विशेष तयारी यांचा समावेश आहे. लडाखमधील मेंटोक कांग्री हे सुमारे ६,२५० मीटर उंचीवरील एक आव्हानात्मक हिमशिखर आहे. या मोहिमेत गिर्यारोहकांना प्रतिकूल हवामान, कमी प्राणवायू आणि दीर्घ पायी प्रवासाचा सामना करावा लागणार आहे. भारतीय तिरंगा आणि ‘गिरिप्रेमी’चा ध्वज शिखरावर फडकवून हा महिला संघ यशस्वीपणे परत येईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
Source link
कर हर मैदान फतेह:'गिरीप्रेमी'च्या 11 महिला मेंटोक कांग्री मोहिमेवर रवाना; लडाखमधील 6,250 मीटर उंचीवरील हिमशिखर करणार सर