Headlines

'एकनाथ शिंदेच खरी शिवसेना पुढे नेत आहेत':सचिन अहिरांच्या पक्षप्रवेशावर रामदास आठवलेंची प्रतिक्रिया, उद्धव ठाकरेंवरही अप्रत्यक्ष टीका




उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का देत विधान परिषदेचे नवनिर्वाचित उपसभापती सचिन अहिर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे हेच बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत असल्याचे सांगत त्यांनी सचिन अहिर यांच्या निर्णयाचे समर्थन केले. ‘एकनाथ शिंदे यांनी तळागाळात अधिक काम केले’ रामदास आठवले म्हणाले, “ही बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे. उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली पुढे आले. मात्र, एकनाथ शिंदे यांनी तळागाळात उद्धव ठाकरेंपेक्षाही अधिक काम केले आहे. ठाण्यात शिवसेना वाढवण्यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले आहे. त्यामुळे शिवसेना त्यांची नाही, असे म्हणणे योग्य ठरणार नाही.” ‘सचिन अहिरांचा निर्णय योग्य’ सचिन अहिर यांच्या पक्षप्रवेशाबाबत बोलताना रामदास आठवले म्हणाले की, “सचिन अहिर महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री राहिले आहेत. ते वरळी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर त्यांना आदित्य ठाकरे यांच्या विजयासाठी शिवसेनेत आणण्यात आले होते.” ते पुढे म्हणाले, “आज त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामागे त्यांची कारणे योग्य आहेत.” ‘धनुष्यबाण, नाव आणि बाळासाहेबांचा वारसा शिंदेंकडे’ रामदास आठवले यांनी पुढे दावा केला की, “सचिन अहिर यांचे मत आहे की एकनाथ शिंदे यांचाच पक्ष खरी शिवसेना आहे. कारण धनुष्यबाण हे पक्षचिन्ह, शिवसेना हे नाव आणि बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा त्यांच्याकडे आहे. त्यामुळेच त्यांनी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला.” राजकीय चर्चांना उधाण सचिन अहिर यांनी नुकताच ठाकरे गटाला रामराम करत शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर त्यांची विधान परिषदेच्या उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली. या घडामोडीनंतर विशेषतः मुंबईतील शिवसेनेच्या राजकारणात आणि वरळी मतदारसंघाच्या भविष्यातील समीकरणांबाबत चर्चांना वेग आला आहे. दरम्यान, रामदास आठवले यांच्या या वक्तव्यामुळे ठाकरे आणि शिंदे गटातील राजकीय वादाला आणखी धार मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *